भाजपला मुंडे परिवार बोचतोय का?

ज्या मुंडे परिवाराने भाजपला तळागाळापर्यंत पोहोचवलं, त्या मुंडे परिवाराला भाजप सातत्याने का डावलतोय? वाचा प्रशांत वाघाये यांनी उपस्थित केलेले काही सवाल…

Update: 2021-07-08 13:20 GMT

 बहुचर्चित असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या विस्तारात महाराष्ट्रातील चार नव्या लोकांना संधी देण्यात आली, (त्यामध्ये अगदी सुरुवातीपासुन कोण कोण भाजपचे निष्ठावंत होते? यांचं वेगळं विश्लेषण होऊ शकते.)

यामध्ये अनेक लोकांना एक नाव अपेक्षित होतं. मात्र, त्यांना संधी देण्यात आली नाही. ते म्हणजे डॉ. प्रीतम मुंडे. 2014 च्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे निवडून आले. त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली, नंतर त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मग झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या डॉ. प्रीतम मुंडे यांनी निवडणूक लढवली आणि त्या लोकसभेत आल्या.

2019 मध्ये देखील त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढवली आणि दुसऱ्यांदा त्या लोकसभेत गेल्या. आजवरची डॉ. प्रीतम मुंडे यांची लोकसभेतील कामगिरी समाधानकारक आहे. हे कोणीही सांगेल. गेल्या काही वर्षात महाराष्ट्र राज्यात भाजपला जे काही यश प्राप्त झालं त्याची पाळंमुळं ही गोपीनाथ मुंडे यांनी रोवली आहेत हे कोणी नाकारू शकणार नाही.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव कशा पद्धतीने झाला? हे देखील वेगळे सांगायची गरज नाही. तो पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे विधान परिषदेत येतील. अशी चर्चा सर्वत्र होती. मात्र, तसही काही घडलं नाही.

पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध निवडून आलेले धनंजय मुंडे यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद दिलं गेलं. असं असताना मराठवाड्यात पंकजा मुंडे यांना ताकद देण्याची खरं तर भाजपने गरज होती. मात्र, त्यांनी ती गोष्ट जाणीवपूर्वक टाळली. मुंडे भगिनींना कमकुवत करण्याची एकही संधी भाजपा सोडत नाहीये हे यावरून स्पष्ट होते.

डॉ. प्रीतम मुंडे ह्या उच्चशिक्षित आहेत, एक चांगल्या डॉक्टर आहेत, त्यांना केंद्रीय मंत्रिपद दिले असते तर त्याचा फायदा निश्चित देशाला आणि राज्यालाही झाला असता, मात्र तसं करण्याचा मोठेपणा भाजपने दाखवला नाही.

महाराष्ट्रातील कोणत्या खासदारांना केंद्रीय मंत्री पद द्यावे हे कोण ठरवतं हेही सगळ्यांना माहिती आहे. मग महाराष्ट्रातल्या भाजपच्या प्रमुख नेत्यांना पंकजा मुंडे किंवा डॉ. प्रीतम मुंडे मोठ्या झालेल्या बघायच्या नाहीत का? असा प्रश्न निर्माण होतो.

ज्या माणसाने मोजक्या लोकांमध्ये असलेला पक्ष राज्यभरात पोहोचवला त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलींमध्ये कर्तुत्व असूनही त्यांना का डावललं जातंय? हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. कारण गोपीनाथ मुंडे हे जरी भाजपचे नेते होते तरी सबंध राज्यात ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे ते नेते होते, पक्षापलीकडे जाऊन माणुस जपणारे ते नेते होते. प्रचंड लोकप्रिय आणि लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नेते होते. त्याचप्रमाणे त्यांच्या दोन्ही कन्या राजकारणात पुढे आहेत आणि गोपीनाथराव मुंडे यांचा वसा समर्थपणे चालवत आहेत.

पंकजा मुंडे यांनी तर प्रचारात अक्खा महाराष्ट्र पिंजून काढला. आज ओबीसी समाजाच्या नेत्या म्हणून सबंध राज्य मुंडे भगिनींकडे आशेने बघतो आहे. डॉ. प्रीतम मुंडे यांची लोकसभेतील कामगिरी उत्तम आहे, कमी कालावधीमध्ये त्यांनी चांगली प्रतिमा मतदारसंघ, राज्य आणि दिल्लीत तयार केली आहे. तरीही डॉ. प्रीतम मुंडे यांना काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान का देण्यात आले नाही? हा प्रश्न कायम आहेत त्याचे उत्तर आपल्याला शोधायचं आहे.

प्रशांत वाघाये

लाखनी, भंडारा.

Tags:    

Similar News