देवेंद्र फडणवीस यांचा नेते म्हणून उल्लेख का टाळला, पंकजा मुंडेंनी दिले कारण...
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रितम मुंडे यांना संधी न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा होती. पंकजा मुंडे यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधत या सर्व चर्चा चुकीच्या असल्याचे सांगितले आहे. राज्यभरातून मुंबई दाखल झालेल्या कार्यकर्त्यांशी पंकजा मुंडे यांनी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांशी बोलत असताना पंकजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जे. पी.नड्डा हे आपले नेते आहेत, असा उल्लेख केला. तसेच आपल्या भाषणात त्यांनी येत्या काळात आपण वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहोत, असा इशाराही देणारी सूचक वक्तव्यं सुद्धा केली.
या भाषणानंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. या पत्रकार परिषदेत पत्रकरांनी पंकजा यांनी मोदी, अमित शाह आणि जे.पी.नड्डा यांचाच उल्लेख आपले नेते म्हणून का केला, देवेंद्र फडणवीस असा उल्लेख का केला नाही, असा सवाल विचारला. त्यावेळी मी पक्षाची राष्ट्रीय पदाधिकारी आहे, त्यामुळे आपले राष्ट्रीय नेते केवळ हे तीन वरिष्ठ नेते आहेत, असे सांगत पंकजा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आपली नाराजी अप्रत्यक्षपणे स्पष्ट केली.
योग्य वेळ आली की योग्य निर्णय घेऊ असेही वक्तव्य पंकजा यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना केले होते. त्यावर पत्रकारांनी विचारले असता, योग्यवेळ आली की आपल्याला ते दिसेलच, असे उत्तर देत पंकजा यांनी आपल्या वक्तव्याने गूढ कायम ठेवले. तसेच आपल्या भाषणात पंकजा यांनी कार्यकर्त्यांना स्वल्पविरामाचे म्हणजेच कॉमाचे महत्त्व सांगितले. यावर पत्रकारांनी छेडले तेव्हा पुढच्या काळात असे बरेच कॉमा तुम्हाला दिसतील असे सूचक वक्तव्य पंकजा यांनी केले.
पंकजा यांनी आपल्या भाषणात काय म्हटले?
"मला प्रवास खडतर दिसतो आहे, याआधीही खडतर प्रवास होता, मला संपवण्याचे प्रयत्न झाले तरी मी संपले नाही. सगळ्यांना योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. प्रितम मुंडे यांना मंत्रिपद मिळेल असे वाटत होते, पण कराडांना मिळाले. पण माझ्या समाजाच्या व्यक्तीवर मी नाराज का होईन. माझ्या राष्ट्रीय नेत्यांनी माझा कधी अपमान केला नाही. पांडवांच्या सोबत कृष्ण होता तरीही पांडवांना ५ गावं देण्यास कौरवांनी नकार दिला. पण धर्मयुद्ध टाळण्यासाठी कृष्णाने आणि पांडवांनी प्रयत्न केला. त्यामुळे धर्मयुद्ध टाळण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहे. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करणार आहे. जो चांगला असतो तो धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो"