अदानी घोटाळ्याची JPC चौकशीकरण्यास मोदी सरकार का घाबरते?: पवन खेरा
अदानी (Adani) उद्योगसमुहात २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कोणाची आहे? या गुंतवणुकीत चीनच्या एका नागरिकाचा समावेश आहे, तो चिनी नागरिक कोण? याची माहिती देशातील जनतेला झाली पाहिजे म्हणूनच राहुल गांधी (RahulGandhi) यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे.;
अदानी घोटाळ्यासंदर्भात काँग्रेसने आज देशभर ३५ ठिकाणी डेमोक्रॅसी डिस्क्वालीफाईड पत्रकार परिषदा घेतल्या. मुंबईतील गांधी भवन येथे पत्रकारांशी बोलताना पवन खेरा म्हणाले की, अदानी उद्योग समुहावर मोदी सरकार विशेष मेहरबानी दाखवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर जातात तेंव्हा अदानीही त्यांच्यासोबत असतात, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोदींनी अदानींना कंत्राट देण्यासाठी व एसबीआयकडून कर्ज देण्यासाठी मेहरबानी दाखवली.
श्रीलंकेतील ऊर्जा क्षेत्राचे कंत्राट देण्यासाठी श्रीलंका सरकारवर मोदींनी दबाव टाकला. बांग्लादेशातील वीज पुरवठ्याचे कंत्राट अदानीला मिळावे यासाठी मोदींनी दबाव टाकला. एलआयसीच्या ३३ कोटी गुंतवणूकधारांचा पैसा अदानीच्या कंपनीत गुंतवण्यास भाग पाडले. हा पैसा धोक्यात आला असून जनतेच्या पैशाची सुरक्षितता काय? हा प्रश्न आहे.
सरकारी यंत्रणांचे छापे मारून, दबावतंत्राचा वापर करून अनेक महत्वाचे उद्योग अदानीच्या घशात घातले आहेत. अदानी-मोदी यांचा संबंध काय? असा प्रश्न संसदेत उपस्थित करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धारेवर धरले. पण मोदी सरकारने राहुल गांधी यांच्या भाषणातील मोठा भाग कामकाजातून काढून टाकला. मल्लिकार्जून खर्गे यांनी अदानीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांचा भागही संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आला.
मोदी सरकार अदानी प्रश्नावर इतके का घाबरत आहे? राहुल गांधी यांनी ७ फेब्रुवारीला संसदेत अदानी-मोदी संबंधाचा मुद्दा उपस्थित केला आणि ९ दिवसानंतर लगेच सुरत कोर्टातील जुने प्रकरण बुलेट ट्रेनच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने कारवाईसाठी उघडले गेले. २३ तारखेला राहुल गांधींना २ वर्षाची शिक्षा सुनावली आणि २४ तासाच्या आत राहुल गांधींची खासदारकीही रद्द केली. एवढ्यावरच मोदी सरकार थांबले नाही तर राहुल गांधींना सरकारी घर खाली करण्याची नोटीसही पाठवली.
राहुल गांधींनी देशातील १४० कोटी जनतेच्या मनात घर केले आहे, मोदींना थेट प्रश्न विचाण्यास ते घाबरत नाहीत. पण ५६ इंचाची छाती व ३०३ खासदारांचे मोठे बहुमत असतानाही मोदी संयुक्त संसदीय समितीमार्फत (JPC) चौकशी करण्यास का घाबरत आहेत. राहुल गांधी यांनी ओबीसींचा अपमान केल्याचा धादांत खोटा व हास्यास्पद आरोप भाजपा करत आहे. निरव मोदी, ललित मोदी हे ‘पिछडे नही, मोदीजी के बिछडे हुई भाई’ है..असा टोला लगावत नरेंद्र मोदी त्यांचे मित्र गौतम अदानींसाठी दररोज १८-१८ तास काम करतात असे म्हटले.
महाविकास आघाडी मजबूत..
सावरकर मुद्द्यावर महाविकास आघाडीत फुट पडल्याच्या आरोपात कसलेही तथ्य नाही, ही आघाडी मजबूत आहे. प्रत्येक पक्षाचे आपले-आपले विचार असतात, प्रत्येकाला विचार मांडण्याचे स्वातंत्र आहे. लोकशाहीत संवाद महत्वाचा असतो तो संवाद महाविकास आघाडीमध्ये आजही आहे. भाजपाकडून सावरकरांचा मुद्दा देशातील ज्वलंत प्रश्नापासून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी वापरला जात आहे. सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या बद्दल जे लिखाण केले आहे ते भारतीय जनता पक्षाला मान्य आहे का? याचे उत्तर भाजपाने द्यावे असेही पवन खेरा म्हणाले.
या पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रवक्ते चरणसिंग सप्रा, डॉ. राजू वाघमारे, काकासाहेब कुलकर्णी, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा उपस्थित होते.