सत्यपाल मलिक आताच का बोलले? निखिल वागळे यांनी सांगितलं कारण
Satyapal Malik: सत्यपाल मलिक यांनी केलेले गौप्यस्फोट इतक्या उशीरा का? असा सवाल अनेकांकडून केला जात आहे. त्यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी नेमकं कारण काय असू शकतं? हे सांगितलं आहे.
सत्यपाल मलिक यांनी द वायरचे (The Wire) करण थापर (Karan Thapar) यांना स्फोटक मुलाखत दिली. या मुलाखतीत पुलवामा हल्ल्यावरून पंतप्रधान मोदी (PM Modi) यांना जबाबदार धरले आहे. त्याविषयी बोलताना निखिल वागळे म्हणाले की, सत्यपाल मलिक हे चरणसिंह याचे सहकारी होते. हे खरं आहे. पण त्याआधी सत्यपाल मलिक हे डॉ. लोहियांच्या (Dr. Lohiya) तालमीत तयार झालेले आहेत. ते विक्षिप्त स्वभावाचे नक्की आहेत. पण त्यांच्यावर लोहियांच्या विचारांचा पगडा आहे. एवढंच नाही तर सत्यपाल मलिक हे पंतप्रधान मोदी यांचे विश्वासू होते. त्यामुळेच सत्यपाल मलिक यांना पंतप्रधान मोदी यांनी भाजपचे उपाध्यक्ष केलं. त्याबरोबरच जम्मू काश्मीर, मेघालय आणि गोवा येथील राज्यपाल बनवलं होतं.
सध्या पंतप्रधान मोदी आणि त्यांचे मतभेद झाल्यामुळे ते चिडले आहेत. हे खरं आहे. मात्र ते राज्यपाल असतानाही पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्याशी अपमानास्पद वागणूक दिल्यानंतर ते नाराज होते. त्यानंतर त्यांना संधी मिळताच याआधीही ते बोलले आहेत. आता त्यांच्या लक्षात आलं की पुलवामावर बोलणं आवश्यक आहे. त्याचं कारण म्हणजे आता निवडणूका जवळ आलेल्या आहेत. ते राजकारण जरुर आहे. पण हे खरं आहे की खोटं हे भाजपवाल्यांनी सिध्द करावं, असं मत निखिल वागळे यांनी व्यक्त केले.
सत्यपाल मलिक जे बोलत आहेत. त्याला सर्व बाजूंनी दुजोरा मिळत आहे. त्याची चौकशी व्हायला हवी. मात्र भाजपची एक सवय आहे की, जो बोलतो त्याला बदनाम करायचं, असं निखिल वागळे म्हणाले.