मोदीविरोधी आघाडीचे नेतृत्व कोण करणार? ममता बॅनर्जींनी मांडली भूमिका

Update: 2021-07-29 03:22 GMT

courtesy social media

प.बंगालमध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपला धूळ चारल्यानंतर आता पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशभरात मोदीविरोधी आघाडी तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याच संदर्भात त्यांनी बुधवारी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. त्यांचा आणखी काही दिवस दिल्लीत मुक्काम आहे. या दरम्यान त्या इतरही विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. भाजपविरोधात विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत आपली राजकीय परिस्थिती, कोरोनाची स्थिती या विषयांवर चर्चा झाली अशीही माहिती त्यांनी दिली.

पण भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व कोण करणार, या प्रश्नावर ममता बॅनर्जी यांनी सूचक उत्तर दिले आहे. "सर्व विरोधकांनी एकत्र यावे असे म्हटले जाते. पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याचे काम मी करते आहे. मला नेतृत्व करायचे नाही तर एक साधी कार्यकर्ती म्हणून काम करायचे आहे " असे उत्तर त्यांनी दिले.

पण त्याचवेळी मोदीविरोधी आघाडीचा चेहरा आपण असणार का, या प्रश्नावर ममता बॅनर्जींनी सूचक उत्तर दिले. "मी राजकीय ज्योतिषी नाही. पण तेव्हाची परिस्थिती आणि चित्र यावर सारे काही अवलंबून असेल. दुसरे कुणी नेतृत्व केले तरी मला काही अडचण नाही. जेव्हा यावर निर्णयाची वेळ येईल तेव्हा चर्चा केली जाऊ शकते", असे उत्तर त्यांनी दिले.

एकूणच ममता बॅनर्जी यांनी मोदीविरोधी आघाडीचे नेतृत्व करण्यास आपण तयार असल्याचे संकेत यामधून दिले आहे. तसेच प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.

Tags:    

Similar News