राष्ट्रवादी काँग्रेस गृहखाते सोडणार?
शिवसेना नेत्यांनी भाजप नेत्यांविरोधात केलेल्या तक्रारीवर कारवाई होत नसल्याने मुख्यमंत्री गृहखात्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून गृहखाते शिवसेना किंवा काँग्रेसकडे जाईल अशी चर्चा आहे. असे झाले तर नवे गृहमंत्री कोण याबाबत काही नावं चर्चेत आली आहेत.;
शिवसेना नेत्यांनी भाजप नेत्यांविरोधात केलेल्या तक्रारीवर कारवाई होत नसल्याने मुख्यमंत्री गृहखात्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून गृहखाते शिवसेना किंवा काँग्रेसकडे जाईल अशी चर्चा आहे. असे झाले तर नवे गृहमंत्री कोण याबाबत काही नावं चर्चेत आली आहेत.
केंद्रीय यंत्रणांनी महाविकास आघाडी सरकारमधील एकेका मंत्र्यावर आणि नेत्यांवर कारवाईला सुरूवात केली आहे. पण यानंतर ED थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे, त्यानंतर संजय राऊत यांच्यावर कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे शिवसेनेतही अस्वस्थता आहे. याच अस्वस्थतेमधून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत भाजप नेत्यांवर कारवाईला सुरूवात केली. पण या कारवाईमध्ये गृहखात्याकडून हवी तशी मदत मिळत नसल्याची नाराजी खुद्द मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली. त्यानंतर गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मग अशी कोणतीही नाराजी नसल्याचे मुख्यमंत्र्यांना जाहीर करावे लागले. पण यातूनच आता गृहखाते राष्ट्रवादीकडून शिवसेना किंवा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता व्यक्त होते आहे. असे झाल्यास गृहमंत्री पदासाठी कोणकोणते चेहरे चर्चेत आहेत, त्यावर एक नजर टाकूया...
काँग्रेसकडे गृहखाते गेले तर नाना पटोले यांच्याकडे गृहखाते जाऊ शकते. कारण नाना पटोले हे आक्रमक आहेत, हायकमांडचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि थेट मोदींना आव्हान देण्याची नाना पटोले यांची तयारी असते.
यानंतर काँग्रेसमधून आणखी एका नावाचा विचार केला जाऊ शकतो तो विजय वडेट्टीवार यांचा....वडेट्टीवार यांचाही स्वभाव आक्रमक आहे.
तर दुसरीकडे शिवसेनेने गृहखाते आपल्याकडे घेतले तर यामध्ये ३ नावांची चर्चा होऊ शकते. यातील एक नाव आहे ते भास्कर जाधव यांचे...भास्कर जाधव यांचा आक्रमक स्वभाव आणि भाजपला थेट भिडण्याची हिंमत यामुळे त्यांचा विचार होऊ शकतो.
याचबरोबर उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि एकनिष्ठ सहकारी एकनाथ शिंदे यांच्यावरही ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
एकनाथ शिंदे यांच्यावर कोणताही आरोप नसल्याने त्यांचा विचार होऊ शकतो.
किंवा आणखी एक शक्यता म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत:कडे गृहखाते ठेवू शकतात. गेल्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनीही गृहखाते स्वत:कडे ठेवल्याचे उदाहरण आहे.