गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ला कोणी केला?

गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ला कोणी केला? Who Was Attacked on BJP MLA Gopichand Padalkar's car, incident in Solapur

Update: 2021-06-30 16:58 GMT

विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली आहे. माझ्यावर गोळ्या जरी घातल्या तरी माझा आवाज बंद होणार नाही, अशा तीव्र शब्दात गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सोलापुरात ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी पडळकरांच्या अध्यक्षतेखाली घोंगडी बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी मड्डी वस्ती येथे हा हल्ला झाला आहे. याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी ताबडतोब दाखल झाले होते.

भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांच्या निवासस्थानासमोर झाला हल्ला

भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी आमदार गोपीचंद पडळकर यांनी घोंगडी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या ठिकाणी जाताना गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दोन अज्ञात इसमानी दगडफेक केली. या दगडफेकीमुळे एकच गोंधळ उडाला होता. कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे गोपीचंद पडळकर यांच्या वाहनाजवळ आले आणि सुरक्षाकडे बांधून थांबले.

पवारांच्या नेतृत्वाखाली गुंडगिरी चालते:गोपीचंद पडळकर

आमदार गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार, अजित पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली होती. दिवसभर सोलापुरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बाबत चर्चा सुरू होती. ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी पडळकरांचा दिवसभर सोलापूर दौरा आयोजित होता. शहरात आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी घोंगडी बैठका आयोजित केल्या होत्या.

सायंकाळी 7.30 च्या सुमारास भाजप नगरसेवक सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी जाताना हा हल्ला झाला. दोन इसम ऍक्टिव्व्हा या दुचाकी वरून आले आणि दगडफेक करून निघून गेले. यानंतर गोपीचंद पडळकर शासकीय विश्राम गृहात आले. त्यावेळी त्यांनी पून्हा शरद पवार यांच्यावर टीका करत पवार यांच्या नेतृत्वाखाली गुंडगिरी चालते अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

पडळकर यांना कोणतीही इजा झाली नाही

या हल्ल्यात आमदार गोपीचंद पडळकर यांना कोणत्याही प्रकारची इजा किंवा जखम झाली नाही.खुद्द पडळकरांनी याबाबत माहिती दिली की मी सुखरूप आहे. माझ्या चाहत्यांनी काळजी करू नये असे आवाहन केले आहे

Tags:    

Similar News