Governor of Maharashtra : कोण आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल Ramesh Bais ?

Update: 2023-02-12 14:05 GMT

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील (Mumbai) मोक्याची ठिकाणी असलेलं राजभवन (Rajabhavan) 50 एकर जमिनीवर वसलेले आहे व त्याच्या तीनही बाजूंना समुद्र आहे. मलबार हिल येथील राजभवन संकुल हे मैलभर लांब असलेली दाट वने, वाळुचे समुद्र किनारे आणि अनेक प्रकारच्या टवटवीत हिरवळीने व्यापले आहे. मुंबई राजभवनाबाबत सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ते दिड शतकांपासून इतिहासाचे साक्षीदार असलेल्या राजभवनवर विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या (Bhagatsing Koshari) राजीनाम्यामुळे नवे राज्यपाल रमेश बैस (Ramesh bais) विराजमान होणार आहेत. कोण आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस?

भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर आता रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. राष्ट्रपती भवनाने देशातील १३ राज्यपालांची बदली केली आहे. रमेश बैस हे झारखंडचे विद्यमान राज्यपाल आहेत. त्याआधी त्यांनी त्रिपुरा (Tripura) राज्याचे राज्यपाल पद सांभाळले होते. २ ऑगस्ट १९४७ रोजी जन्मलेल्या रमेस बैस यांनी वाजपेयी सरकारच्या (AtalBihari Vajpeyee) काळात राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. रमेश बैस हे सात वेळा खासदार राहिलेले आहेत. भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. छत्तीसगढचे मध्य प्रदेशमधून विभाजन होण्याअगोदर त्यांनी मध्य प्रदेशचे आमदार म्हणूनही काम पाहिले. आजवर एकही निवडणूक पराभूत न झालेला नेता, अशी त्यांची ओळख आहे.

रमेश बैस यांची झारखंडच्या राज्यपालपदावर नियुक्ती 2021 मध्ये झाली होती. दोनच वर्षांत त्यांना झारखंडमधून महाराष्ट्रात पाठवण्यात आलं आहे. महाराष्ट्रात भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपालपदाची जवळपास साडेतीन वर्षांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरली होती. अखेर, त्यांनी दिलेला राजीनामा मंजूर करण्यात आला आणि त्यांच्या ऐवजी नवा चेहरा म्हणून रमेश बैस महाराष्ट्रात दाखल झाले आहेत.

अनेक वादग्रस्त वक्तव्यामुळे टिकेच धनी ठरलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सत्ताधारी शिंदे फडणवीस गटालाही अडचणीचे ठरत होते. नुकतेच मुंबई दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याजवळ त्यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु (Draupadi murmu) यांनी कोश्यारींचा राजीनामा मंजूर केल्यानंतर नवी जबाबदारी रमेश बैस यांच्याकडे सोपवली आहे. अशा स्थितीत रमेश बैस यांच्या कारकीर्दीवर सर्वांचं लक्ष असेल, हे निश्चित. या पार्श्वभूमीवर रमेश बैस यांचा आजवरचा राजकीय प्रवास कसा राहिला, हे पाहणंही या निमित्ताने महत्त्वाचं आहे.

नगरसेवक ते खासदार

बैस यांचा जन्म 02 ऑगस्ट 1947 रोजी रायपूरमध्ये (पूर्वीचा मध्य प्रदेश आणि आताचे छत्तीसगढ) झाला. त्यांचं शालेय शिक्षण भोपाळमध्ये झालं. पुढे त्यांनी राजकारणात प्रवेश केला 1978 मध्ये ते रायपूरच्या नगरपालिकेत निवडून आले. 1980 मध्ये झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांनी बैस यांनी काँग्रेसच्या सत्यनारायण शर्मा यांचा पराभव करत बाजी मारली.1989 मध्ये ते पहिल्यांदा भाजपकडून लोकसभेवर निवडून गेले. रायपूर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यानंतर सलग 6 वेळा याच मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले होते.

वाजपेयी सरकारमधील मंत्री

1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते पर्यावरण आणि वनखात्याचे मंत्री होते.

तसंच नंतर याच सरकारमध्ये पोलाद, खाणी, खते, माहिती आणि प्रसारण खात्याचीही धुरा सांभाळली.2014 सालीही त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. पण नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळू शकलं नाही.

2019 पासून राज्यपालपदावर

2019 च्या लोकसभा निवडणुकीत रमेश बैस यांना पुन्हा तिकिट देण्यात आलं नाही. मात्र त्यांची नियुक्ती त्रिपुराच्या राज्यपालपदावर करण्यात आली.

रमेश बैस झारखंडचे 2021 पासून राज्यपाल आहेत. 2019 ते 2021 या कालावधीत ते त्रिपुराचे राज्यपाल होते.

भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिपदाचाही अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. रमेश बैस हे आजवर एकही निवडणूक पराभूत झालेले नाहीत. लागोपाठ विजय मिळूनही २०१९ मध्ये त्यांचे तिकीट कापले गेले. बैस यांच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुख्य प्रवाहातून बाजूला केले गेले. मात्र २०१९ ची लोकसभा निवडणूक पार पडताच. त्यांची वर्णी त्रिपुरा राज्याचे राज्यपाल म्हणून केली गेली. लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबतच सुषमा स्वराज यांच्यासोबतही त्यांचे संबंध चांगले होते. सुषमा स्वराज या रमेश बैस यांना आपला बंधू मानत होत्या.

रमेश बैस यांची झारखंडमधे वादग्रस्त कारकीर्द

रमेश बैस (ramesh bais)यांचा झारखंड सरकारशी गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु होतो. त्यांनी झारखंड विधानसभेने संमत केलेले ‘झारखंड वित्त विधेयक-2022’ दोन दिवसांपुर्वीच राज्य सरकारकडे परत पाठवले. तिसऱ्यांदा त्यांनी हे विधेयक परत पाठवले. यामुळे झारखंड सरकार आणि राज्यपाल असा संघर्ष दिसून आला.

इतर बिगर भाजप शासित राज्यांमध्ये ज्यापध्दीने राज्यपाल आणि मुख्यमंत्री संघर्ष चालतो त्याच पध्दतीने झारखंड मुक्ती मोर्चा प्रणित झारखंडचे मुख्यमंत्री

हेमंत सोरेन विरुध्द राजपाल रमेश बैस असा संघर्ष सुरु होता. राज्यसरकारमधील राज्यपालांच्या अतिरीकी हस्तक्षेपाची तक्रार केंद्रापर्यंत पोहोचली होती.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या ऑफिस ऑफ प्रॉफिट (लाभाचे पद) प्रकरणात राज्यपाल रमेश बैस यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मत मागवले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली होती. गतवर्षी 25 ऑगस्ट आयोगाकडून राजभवनला एका सीलबंद लिफाफ्यामधे पत्र पाठवण्यात आले.

या लिफाफ्यातील मजकुर अधिकृतपणे अद्याप बाहेर आलेला नाही. पण तो सील बंद लिफाफ्याबाबत अनेक अफवा उडत आहेत.

मुख्यमंत्री हेंमत सोरेन यांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची धोक्यात असल्याचे सांगितले जात होते.

असेही सांगण्यात येत होते की मुख्यमंत्र्यांची आमदारकी रद्द करण्याची आयोगाची शिफारस होती. परंतू शेवटपर्यंत रमेश बैस या प्रकरणात शांत बसले.

ज्यावर मुख्यमंत्री आणि सत्तापक्षाचे आमदार चिंतेत होते. राज्यपालांविरोधात सत्ता पक्षाचे अनेक आमदार झारखंड से बाहेर रायपुरात एकजुट होते.

त्यामुळे सोरेन सरकारला विशेष सत्र बोलवून विश्वासाचा प्रस्ताव मांडून मंजूर करावा लागला. राज्यपाल रमेश बैस यांनी शेवटपर्यंत या बंद लिफाफ्याचा रहस्य

खोलले नाही हे विशेष.

एका खाजगी चॅनलने दिलेल्या मुलाखतीमध्ये झारखंड सरकारच्या अटीतटीच्या प्रश्नावर रमेश बैस यांनी सांगितले की, जर मी विचार चुकीचा होता, तर मी निवडणुक आयोगाच्या शिफारसीचा आधार घेऊ शकतो परंतु मी कोणत्याही बदनामासाठी निर्णय घेऊ शकतो. पण मला बदला घ्यायचा नव्हता.

मी एक संवैधानिक पद स्वीकारुन मला संविधानाची रक्षा करणे कर्तव्य आहे.

महाराष्ट्रातील आतापर्यंतचे राज्यपाल क्र. नाव कालावधी

1 श्री. प्रकाश 10 डिसेंबर, 1956 ते 16 एप्रिल, 1962

2 परमशिव सुब्बारायन 17 एप्रिल, 1962 ते 06 ऑक्टोबर, 1962

3 विजयालक्ष्मी पंडित 28 नोव्हें, 1962 ते 08 ऑक्टोबर, 1964

4 डॉ. पी.व्ही. चेरियन 14 नोव्हेंबर, 1964 ते 08 नोव्हेंबर, 1969

5 डॉ.नवाब अली बहादूर 26 फेब्रुवारी, 1970 ते 11 डिसेंबर, 1976

6 सादिक अली ताहिर अली 30 एप्रिल, 1977 ते 02 नोव्हेंबर, 1980

7 ओमप्रकाश मेहरा 03 नोव्हेंबर, 1980 ते 05 मार्च, 1982

8 इद्रिस हसन लतिफ 06 मार्च, 1982 ते 16 एप्रिल, 1985

9 कोना प्रभाकर राव 30 एप्रिल, 1985 ते 02 एप्रिल, 1986

10 शंकरदयाल शर्मा 03 एप्रिल, 1986 ते 02 सप्टेंबर, 1987

11 कासु ब्रह्मानंद रेड्डी 20 फेब्रुवारी, 1988 ते 18 जानेवारी, 1990

12 सी. सुब्रह्मण्यम 15 फेब्रुवारी, 1990 ते 07 जानेवारी, 1993

13 डॉ. पी.सी. अलेक्झांडर 12 जानेवारी, 1993 ते 12 जुलै, 2002

14 डॉ. मोहम्मद फझल 12 ऑक्टोबर, 02 ते 26 नोव्हेंबर, 2004

15 एस. एम. कृष्णा 06 डिसेंबर, 2004 ते 18 जुलै, 2008

16 एस. सी. जमीर 19 जुलै, 2008 ते 22 जानेवारी, 2010

17 कतीकल शंकरनारायणन 22 जानेवारी, 2010 ते 24 ऑगस्ट, 2014

18 सी. विद्यासागर राव 30 ऑगस्ट, 2014 ते 4 सप्टेंबर 2019

19 भगतसिंह कोश्यारी 5 सप्टेंबर 2019 ते 12 फेब्रुवारी 2023

20. रमेश बैस - नवे राज्यपाल

Tags:    

Similar News