महापुरुषांचा अवमान करणारा अनाजी पंत कोण? आशिष शेलार यांच्या ट्वीटने पुन्हा चर्चांना उधाण
राज्याचे हिवाळी अधिवेशन महापुरुषांच्या अवमानावरून गाजले. त्यातच छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले होते. त्यावरून भाजप आणि शिंदे गट आक्रमक झाला आहे. त्यापार्श्वभुमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी अनाजी पंतांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे अनाजी पंत नेमके कोण? अशा चर्चांना उधाण आले आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाही तर स्वराज्यरक्षक होते, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाने आक्रमक होत अजित पवार यांचा निषेध केला. दरम्यान शिवसेनेचे मुखपत्र सामनातूनही अजित पवार यांचे समर्थन करण्यात आले आहे. त्यातच आशिष शेलार यांनी अनाजी पंत यांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
आशिष शेलार यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असं वक्तव्य केलं. जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा नव्हता, असं म्हटलं आहे. तर दाऊदशी व्यवहार करणाऱ्या नवाब मलिक यांच्या पक्षांच्या नेत्यांची ही विधाने महाराष्ट्राने हलक्यात घ्यावीत का? असं म्हणत ही एक औरंगजेबी चाल तर नाही ना? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला.
◆छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते- मा.अजित पवार
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 3, 2023
◆औरंगजेब क्रूर, हिंदूद्वेष्टा नव्हता - मा.जितेंद्र आव्हाड
◆दाऊदशी व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकांच्या पक्षाच्या नेत्यांची ही विधाने महाराष्ट्राने हलक्यात घ्यावी का?
◆ही एक "औरंगजेबी" चाल तर नाही ना?
1/3
पुढे म्हटले आहे की, उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन चाकी सरकार आल्यापासून नियोजनबध्द कट रचला आहे? म्हणूनच छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते म्हणणाऱ्या अजित पवार यांची आज सामनाने पाठराखण केली आहे. या कटाची स्क्रीप्ट प्रभादेवीच्या ऑफिसमध्ये बसून अनाजी पंतांनी लिहीली आहे? असं आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
◆मा. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन चाकी सरकार आल्यापासून नियोजनबध्द कट रचलाय?
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 3, 2023
◆ म्हणूनच छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते हे सांगणाऱ्या अजित पवार यांची आज सामनाने पाठराखण केलेय?
◆या कटाची स्क्रिप्ट प्रभादेवीच्या कार्यालयात बसून "अण्णाजी पंत" यांनी लिहीलेय?
2/3
आशिष शेलार यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये प्रभादेवीच्या ऑफिसमध्ये बसून अनाजी पंतांनी ही स्क्रीप्ट लिहीली आहे, असं म्हटलं आहे. त्यामुळे आतापर्यंत अनाजी पंत असा उल्लेख कुणाचा केला जात होता, याची माहिती घेतली.
अनाजी पंतांचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात आढळतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांना बंदी बनवण्याचा घाट अनाजी पंतांनी घातल्याचे इतिहासात म्हटले आहे. त्यामुळे संभाजी महाराजांनी अनाजी पंतांना संभाजी राजेंनी हत्तीच्या पायी दिल्याने इतिहासकार म्हणतात. त्याप्रमाणेच 2014 नंतर राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षांकडून आणि ट्रोलर्सकडून देवेंद्र फडणवीस यांचा अनाजी पंत असा उल्लेख केला जात होता.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांनी महापुरुषांचा अवमान केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांनी त्यांना पाठीशी घातलं. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांसह सर्वसामान्य जनतेने देवेंद्र फडणवीस यांचा अनाजी पंत असा उल्लेख केला होता, असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई म्हणाले.
मात्र आशिष शेलार यांनी प्रभादेवीच्या ऑफिसमध्ये बसलेल्या अनाजी पंताने स्क्रीप्ट दिली असेल असं म्हटल्याने आता त्यांचा रोख संजय राऊत यांच्याकडे तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.