विनायक मेटे यांच्या अपघाताची चौकशी व्हायला हवी- अजित पवार

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर या अपघाताची चौकशी व्हायला हवी, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केले.;

Update: 2022-08-14 06:09 GMT

विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार एमजीएम रुग्णालय नवी मुंबई येथे दाखल झाले. यावेळी बोलताना त्यांनी विनायक मेटे यांच्या गाडीच्या अपघाताची चौकशी व्हायला हवी, असं मत व्यक्त केले आहे.

विनायक मेटे हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तळमळीने झटणारे नेते होते. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बैठकीसाठी विनायक मेटे हे बीडवरून रात्रीचा प्रवास करून निघाले होते. कारण या बैठकीत मराठा समाजासाठी काही तरी मार्ग मिळेल, अशी त्यांना आशा होती. मात्र ते मुंबईत पोहचण्यापुर्वीच त्यांचा अपघात झाला. यामध्ये त्यांच्या ड्रायव्हरला डुलकी लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच हा अपघात झाला असू शकतो, असं अजित पवार म्हणाले.

याबरोबरच पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जर यामध्ये शंका दिसत असेल तर या विनायक मेटे यांच्या अपघाताची चौकशी व्हायला हवी. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याने ती होईलच, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.

विनायक मेटे यांच्या पत्नीशी बोलून त्यांना धीर दिला आहे. तसंच आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू, असा शब्द दिला आहे, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

Tags:    

Similar News