कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन होणार?

एनडीए कॅप्टन अमरिंदर सिंह यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी देणार?;

Update: 2022-07-02 09:14 GMT

पंजाबचे माजी मुख्यमंत्री एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. सध्या पंजाब मध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा पंजाब लोक काँग्रेस पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. तीन कृषी कायद्यानंतर पंजाब मध्ये भाजपच्या विरोधात मोठी संतापाची लाट अजूनही पाहायला मिळते.

शहरांपासून गावांपर्यंत ओळख असलेले कॅप्टन अमरिंदर सिंह हे पंजाबचा मोठा चेहरा आहे. म्हणूनच भाजपने कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासोबत युती करून विधानसभा निवडणुका देखील लढवल्या होत्या. त्यात त्यांना अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. कॅप्टन सध्या लंडन येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने उपचार घेत आहेत. ते जुलै च्या दुसऱ्या आठवड्यात पंजाब मध्ये परतणार आहेत.

देशाचे सध्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ 11 ऑगस्टला संपुष्टात येत आहे. 6 ऑगस्टला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुका होत आहेत. यासाठी 5 जुलैला अधिसूचना जारी होणार असून 19 जुलैला अर्ज दाखल करायचा आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंहच का?

तीन कृषी कायद्य्यांमुळे पंजाब मधील शीख समुदायामध्ये भाजप च्या विरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी आजही कायम आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पंजाब महत्त्वाचे राज्य आहे. 13 जागा असलेल्या पंजाब वर भाजपची नजर आहे आणि दुखावलेल्या शीख समुदायाला भाजपशी जोडण्यासाठी भाजप कॅप्टन अमरिंदर सिंह यांना उमेदवारी देऊ शकतात. यासंदर्भात भाजपकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीच्या तोंडावर सध्या चर्चेला मोठं उधाण आलं आहे. 

Tags:    

Similar News