...तर राज ठाकरेंवर UAPA अंतर्गत कारवाई करा, वंचित आघाडीची मागणी

Update: 2022-04-25 12:29 GMT

मुंबई : राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरुन दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. सरकार अशाप्रकारे सूचना आणि उपाय योजना मागवत असल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीने सरकारचे स्वागत केले आहे. पण त्याचबरोबर राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणीही वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

सध्या राज्यातील वस्त्यांमध्ये भीतीदायक आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा आणि प्रक्षोभक भाषणांमधून वातावरण बिघडवत आहे, अशी टीका वंचित आघाडीने केली आहे. पण "काही पोलीसवाले कानात सांगत आहेत की काही मशिदीत व मदरशात समाज विघातक कामे चालू आहेत.' असा आरोप राज ठाकरे यांनी जाहीर सभेत केला होता. देशाच्या हिताच्या दृष्टीने ही गंभीर गोष्ट असल्याने सरकारने याची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन झाडाझडती घेतली पाहीजे व यात काही तथ्य आढळून आल्यास कडक कारवाई पण केली पाहीजे, अशी मागणी करण्यात आली आहे. पण जर यात काही सापडले नाही तर याचा अर्थ राज ठाकरे दोन समाजात तेढ वाढवण्यासाठी अफवा पसरवून प्रक्षोभक भाषणे करत आहेत. आपल्या वक्तव्याने हिंदु समाजात गैरसमजातुन भय आणि दहशत पसरवत आहेत, हे स्पष्ट होते हीच समाज विघातक कृती आहे, त्यामुळे त्यांच्यावर UAPA कायद्या अंतर्गत कारवाई केली पाहीजे" अशीही मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

एवढेच नाही तर "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांची हालचाल लक्षात येण्या इतकी वाढलेली आहे. परिस्थिती चिघळू द्यायची नसेल तर या कार्यकर्त्यांवर करडी नजर ठेवली पाहीजे. गरज वाटल्यास काही संशयित लोकांना ताब्यात घेतले पाहिजे. याच परिस्थितीमुळे मुस्लिम समाजामधील काही कट्टर कार्यकर्ते याला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आढळले तर या सेक्शनवर सुध्दा लक्ष ठेवून उर्वरित मुस्लीम समाजाला सुरक्षिततेच्या बाबतीत सरकारने आश्वस्त केले पाहिजे. महाराष्ट्रात आजपर्यंत ज्या दंगली झाल्यात त्यामध्ये ज्या संघटना व व्यक्तीचा सहभाग आढळून आला त्या संघटना व व्यक्तीचा वेळीच बंदोबस्त करावा" अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी सर्व पक्षीय बैठकीत राज्य सरकारकडे केली आहे.

Tags:    

Similar News