सत्ताधारी पक्षात अस्थिरता - जयंत पाटील

Update: 2023-01-31 07:58 GMT

गेल्या सहामहिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधीपक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधारी पक्षात अस्थिरता असल्याचे प्रतिपादन केले आहे. ते सोलापूरात पत्रकारांशी बोलत होते. 

विरोधीपक्षात कोणतीही अस्थिरता नसल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगत सत्ताधारी पक्षात मात्र अस्थिरता असल्याचे प्रतिपादन केले आणि सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडले. पदवीधर मतदारसंघातील निवडणूकीचे मतदान काल पार पडले. त्यावर भाष्य करताना पाटील यांनी निकालानंतर बोलू असे सांगत त्यावर बोलणे टाळले.

पिंपरी-चिंचवडच्या पोटनिवडणुकीबाबत एक दोन दिवसात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र बसून निर्णय घेणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत काहीही बोलण्यास पाटील यांनी नकार दिला. मात्र शिवसेना-वंचित युतीसोबत काँग्रेस - राष्ट्रवादी एकत्र आल्यास राज्यात २०० च्यावर जागा जिंकून येतील. असे विधान काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. मात्र त्यांच्या या विधानाबाबत जयंत पाटील यांनी बोलणे टाळल्याचे पाहायला मिळाले.

आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे घटक पक्ष हे वंचित बहुजन आघाडीसोबत एकत्र येणार का हे पाहावे लागेल. पण दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी वंचित सोबत युती करुन आपला पक्ष राज्यात मजबूत करण्याच्या कामाला सुरवात केली असल्याचे पाहायला मिळत आहे. पण ही युती किती काळ टिकेल याकडे सुद्धा पाहावे लागणार आहे.

Tags:    

Similar News