ज्यांना अक्कल आहे त्यांच्या ताब्यात जनतेने जिल्हा बँक दिली- नारायण राणे

Update: 2021-12-31 11:55 GMT

सिंधुदुर्ग : मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिद्धिविनायक पॅनलचे ११ संचालक निवडून आलेत. तर विरोधी पॅनलचे ८ संचालक निवडून आलेत त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीमध्ये भाजपचा मोठा विजय झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

"भाजपाची सत्ता आली आहे. माझी नाही. या जिल्ह्यातल्या देवदेवता आणि जनतेच्या आशीर्वादामुळे ही सत्ता आली आहे. विजय मिळवताना अकलेचा वापर झाला, अक्कल ज्यांना आहे, त्यांच्या ताब्यात आमच्या देवदेवतांनी जिल्हा बँक दिली", असं नारायण राणे यावेळी म्हणालेत.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या मोठ्या विजयानंतर आता पुढील नियोजन काय असेल, असं नारायण राणे यांना विचारले असता, राज्यातील सरकारकडे रोख करत "आता यानंतरचं लक्ष्य महाराष्ट्रातील सत्तेचं", असं नारायण राणे म्हणालेत. "आता लक्ष्य महाराष्ट्र सरकार. तिन्ही जिल्ह्यात ज्या काही विधानसभा होणार आहे, त्यासोबत लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचाच असेल. नको असलेले, ज्यांचे चेहरे पाहवत नाहीत, अशा लोकांना आमचा जिल्हा लोकप्रतिनिधीपदी ठेवणार नाही", असा खोचक टोला राणेंनी यावेळी लगावला.

Tags:    

Similar News