आजप्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली आहे. ही महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि लक्षवेधी घडामोड आहे. त्यामुळे आता यापुढे महाराष्ट्रात नविन युतीची चर्चा असणार आहे.
आगामी जिल्हा परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने युती करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत राजकीय युतीची मोठी घोषणा केली. त्यामुळे आता शिवसेनेतील अभूतपूर्व बंडाळीनंतर ठाकरे गटासोबत आंबेडकरांनी युती केल्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी ठाकरे आणि आंबेडकर यांच्यात युतीसाठी बोलणी सुरू होती. परंतु त्याची अधिकृत घोषणा झालेली नव्हती. त्यामुळं आता या युतीमुळं शिंदे गट आणि भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आम्हाला काल स्वप्न पडलं आणि आज एकत्र आलो असं झालेलं नाही. कॉग्रेस, राष्ट्रवादी यांचीशी चर्चा केली आहे. सध्या ही व्यक्तीगत युती असली तरी प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचा घटक व्हावा, अशी ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली.
देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी म्हणून आम्ही दोघं एकत्र येत आहोत. पुढे राजकीय वाटचाल कशी असेल, याविषयी विचारविनिमय करुन आम्ही पुढे जाऊ, असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेचं वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्या युतीमुळे निवडणुकांमध्ये आता बदलाचं वातावरण सुरु होणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. शरद पवार आणि आमचं भांडण जुनं आहे. पण ते आमच्याबरोबर येतील अशी अपेक्षा आंबेडकर यांनी यावेळी बोलून दाखवली.
शिवशक्ती आणि भिमशक्तीचा प्रयोग याआधी सुद्धा झाला होता. पण प्रकाश आंबेडकर आणि मी पहिल्यांदाच या वास्तूमध्ये एकत्र आलो आहे. पुढे एकत्रित चालण्यासाठी एकत्र येतोय. गेली अनेक वर्षे उपेक्षितांचं राजकारण अशी चळवळ अंमलात आणण्याचा प्रयत्न आमचा होता. पण आमच्याच मित्र पक्षाने ही चळवळ गिळंकृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आपण कोणीही अमरपट्टा घेऊन आलेलो नाही. सर्वांचा अंत होणार आहे. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांचा सुद्धा एक दिवस अंत होणार आहे. त्यांनी त्यांच्या पक्षातील ली़डरशीप संपवली, तसे ते सुद्धा एक दिवस संपतील, असे सुद्धा आंबेडकर यावेळी म्हणाले. मी शरद पवार आणि प्रशा आंबेडकर यांचे संबंध सुधारतील यांचा निश्चितपणे मी प्रयत्न करेन, असंही ठाकरे यावेळी म्हणाले.
दुसऱ्याचं घर फोडून स्वत:च घर सजवण्याची औलाद आता राजकारणात दिसतेय. हे राजकारण मोडीत काढायचे असल्याचे ठाकरेंनी या पत्रकार परिषदेत सांगितले. महाविकास आघाडीला आता चौथा भिडू मिळाला असून, वंचित आघाडी आणि ठाकरे गट आगामी निवडणुका एकत्रितपणे लढणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटासाठी मोठं आव्हान उभं राहाणार आहे. याशिवाय या नव्या युतीचे राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या दूरगामी परिणार होणार आहेत.
माझे आणि प्रकाश आंबेडकरांचे आजोबा हे एकमेकांचे स्नेही होते. त्यांनी त्यावेळेला समाजातील वाीट रुढी आणि परंपरेविरोधात प्रहार केला. परंतु आता राजकारणातील वाईट रुढी आणि परंपरांना मोडण्यासाठी ठाकरे आणि आंबेडकर घरण्यातील आम्ही वारसदार एकत्र येत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. सध्या जनतेला भ्रमात ठेवून देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले. सध्या राज्यात आणि देशात जे काही सुरु आहे, ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याची गरज आहे. मोदींच्या सभेत कशा पद्धतीने लोकं आणली गेली. हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे घाणेरडं राजकारण आणि राजकारणातील वैचारीक प्रदूषण संपवण्यासाठी आम्ही युती करण्याचा निर्णय घेतल्याचे ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.