ठाकरेंच्या अडचणी वाढणार?
अलिबाग येथील मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे ९ एकर जागा उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावे खरेदी केली आहे. ही जमीन आर्किटेक्ट कै. अन्वय नाईक यांच्याकडून २०१४ साली खरेदी केली आहे. या प्रकरणात आता ठाकरेंच्या अडचणी वाढणार आहेत. १९ बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक आणि सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे नऊ एकर जागा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या नावे आहे. या जागेतील कथित १९ बंगल्याबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही बाब लपवून ठेवल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या सातत्याने करत होते. या प्रकरणाबाबत सोमय्यानी ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली होती आणि तसे त्यांचे प्रयत्न सुरु होते. अखेर गुरूवारी २३ फेब्रुवारी २०२३ रोजी रेवदंडा पोलीस ठाण्यात मुरुडच्या ग्रामविकास अधिकारी श्रीमती संगिता लक्ष्मण भांगरे यांच्या तक्रारीनुसार कोर्लई ग्रामपंचायत अधिकारी व तत्कालीन सरपंच, सदस्य यांच्या विरुद्ध फसवणूकीसह, संगनमत, १९ बंगल्यांच्या रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे, यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील ९ एकर जमीन आर्किटेक्ट कै. अन्वय नाईक यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावावर २०१४ साली खरेदी करण्यात आली होती. या ९ एकर जमीनीवर १९ बंगले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वारंवार केले होते. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्याची दखल घेत २३ फेब्रुवारी २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना प्रशासनावर दबाव आणून मूळ कागदपत्रामध्ये छेडछाड केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.
किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर २३ फेब्रुवारी २०२३ रोजी तत्कालीन ग्रामसेवक श्रीमती देवंगणा वेटकोळी, विनोद मिंडे, वेदिका म्हात्रे, तत्कालीन सरपंच प्रशांत मिसाळ, गोविंद वाघमारे, रेश्मा मिसाळ, रीमा पिटकर आणि तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य यांच्या विरोधात फसवणूक, संगनमत, १९ बंगलो च्या रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे, यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर क्रमांक २६, आयपीसी कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८ आणि ३४ अन्वये तत्कालीन तीन ग्रामसेवक, चार सरपंच आणि तत्कालीन सदस्य यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास मुपडे हे करत आहेत. रेवदंडा मुरूड रस्त्यावर कोर्लई गावापासून एक किलोमीटरवर समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या ९ एकर जागा आहे. या जागेला कंपाऊंड आहे. या जागेत सध्या दोन मोडकी घरे, एक विहीर, नारळ, चिकुची झाडे, खत निर्मितीच्या टाक्या आहेत. मात्र कथित १९ बंगले कुठेही इथे दिसत नाहीत. आणि या जागेत मोठ्याप्रमाणात गवत वाढलेले आहे.