उद्धव ठाकरेंचा नवा पक्ष
उद्धव ठाकरे आता आपला नवीन पक्ष काढण्यासाठी कामाला लागले आहेत. या नव्या पक्षाची घटना कशी असणार आहे. पक्षाच्या झेड्यांचा रंग कोणता असणार आहे. यासाठी वाचा मॅक्स महाराष्ट्रचा महत्त्वपूर्ण लेख...;
निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूची कागदपत्रे तपासून पाहिल्यानंतर शिवसेना (Shiv Sena ) हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आपला नवीन पक्ष काढण्याच्या तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहेत. सहा महिन्यापूर्वी राज्यात घडलेल्या सत्तासंघर्षाच्या नाट्याने राजकारणात एकच खळबळ उडाली आणि शिवसेनेमध्ये उभी फूट पडली.
एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेत, थेट प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेतली. शिंदे यांच्या या बंडाला शिवसेनेतील ५५ पैकी ४० आमदार आणि १३ खासदार यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे पक्षावरील उद्धव ठाकरे यांनी पकड कमकुवत झाल्याचे पाहायला मिळाले. आणि आता नेमकी शिवसेना कुणाची हा प्रश्न निर्माण झाला आणि हा वाद निवडणुक आयोगाकडे पोहचला. निवडणुक आयोगाने दोन्ही बाजूची कागदपत्रे तपासल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना (Shiv Sena ) पक्षाची कमान सोपवली.
हे राजकीय नाट्य घडल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांचे काय होणार असे प्रश्न उपस्थित होवू लागले. त्यामध्ये आता एक बातमी मॅक्स महाराष्ट्रच्या हाती आली आहे की, आगामी काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आपल्या नविन पक्षाची बांधणी करत आहेत. यासाठी पक्षाची घटना काय असणार आहे, त्यासाठी लीगल फर्मची नेमणूक करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray ) असे नाव सध्या ठाकरे गटाकडून सगळीकडे वापरले जात आहे. आणि मशाल या चिन्हाचा वापर केला जात आहे.
मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला शिवसेना हा मूळ पक्ष हातून गेल्याची सल उद्धव ठाकरे यांना नेहमी सतावत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या पक्षाची मोट बांधण्याचे काम उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी करत आहेत. या नव्या पक्षाच्या घटनेचा गाभा तयार करण्याचे काम सध्या सुरु असल्याचे बोलले जात आहे. नविन पक्षामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुख पद कायम राहणार आहे. तसेच पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्याकडे पक्षाचे सर्व अधिकार असणार आहेत.
नव्या शिवसेनेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) हेच पक्षप्रमुख असणार आहेत. नव्या पक्षाचे सर्वाधिकार हे उद्धव ठाकरे यांच्याकडे असणार आहेत. जुन्या शिवसेनेप्रमाणे नव्या पक्षाचा गाभा साधारणपणे तसाच असणार आहे. पक्षाची नवी घटना तयार करण्यासाठी कायदेतज्ञांची टीम तयार करण्यात आली आहे. ही टिम पक्षाची नवी घटना बनवण्याच्या कामाला लागली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षातील मोठा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिले जात असल्याचे सूचक वक्तव्य ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केले आहे. विरोधी पक्षात उद्धव ठाकरेंचा चेहरा अधिक महत्त्वाचा असल्याचे राऊत यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्याकडे उत्तम नेतृत्त्वगुण असल्याचे राऊत म्हणाले. २०२४ च्या राष्ट्रीय राजकारणात काहीही होऊ शकते, असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावर आता राज्याच्या राजकारणात खलबते सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.