शिवसेना खासदारांकडून उध्दव ठाकरे यांची कोंडी, भाजपला पाठींबा देण्याची मागणी
शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्यापाठोपाठ आणखी एका खासदाराने भाजप उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याची मागणी केली आहे.;
राज्यात शिवसेनेत फुट पडली असताना शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत भाजपला पाठींबा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता आणखी एका शिवसेना खासदाराने भाजपला पाठींबा देण्याची मागणी केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठींब्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. तर उध्दव ठाकरे यांनीही बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली होती. दरम्यान खासदार राहुल शेवाळे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत भाजपला पाठींबा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता आणखी एका शिवसेना खासदाराने भाजपच्या उमेदवाराला पाठींबा देण्याची विनंती उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत. तर 40 बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले आहे. दरम्यान 12 खासदार संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातो. त्यापार्श्वभुमीवर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठींब्याने सरकार स्थापन केल्यामुळे उध्दव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे शिवसैनिक शिंदे गटावर नाराज आहेत. तर उध्दव ठाकरे यांनीही या घटनेवरून भाजपवर सडकून टीका केली आहे. त्यापार्श्वभुमीवर राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत आदिवासी समाजातील द्रोपदी मुर्मू या भाजपच्या उमेदवाराला पाठींबा द्यावा, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती. तर त्यांच्यापाठोपाठ पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनीही उध्दव ठाकरे यांच्याकडे भाजपच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याची विनंती केली आहे.
राजेंद्र गावित यांनी उध्दव ठाकरे यांना म्हटले आहे की, राजकीयदृष्ट्या विचार वेगळे असले तरी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्रपती पदाची संधी मिळू शकते. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी मोठं मन करून भाजप उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याची मागणी केली आहे.
राहुल शेवाळे यांनी काय म्हटलं होतं?
आदिवासी समाजातील सक्षम आणि कतृत्त्ववान महिला म्हणून शिवसेनेने भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी लेखी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याविषयीचे पत्र राहुल शेवाळे यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन दिले.
आपल्या पत्रात खासदार शेवाळे यांनी द्रौपदी मुर्मू यांच्या संवेदनशील सामाजिक आणि यशस्वी राजकीय वाटचालीची प्रशंसा केली आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षीय राजकारणाला छेद देत महाराष्ट्राची कतृत्त्ववान महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान व्हावी, याच हेतूने माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दर्शविला होता. तसेच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कतृत्त्वाचा आदर करत त्यावेळी देखील शिवसेनेने त्यांना पाठिंबा दर्शविला होता. हिच परंपरा कायम ठेवत आदिवासी समाजातील एका कतृत्त्ववान महिलेचा सन्मान करण्यासाठी शिवसेना पक्षाने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा आणि त्यासाठी पक्षाच्या सर्व खासदारांना आदेश द्यावा, अशी विनंती खासदार शेवाळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर आता राजेंद्र गावित यांनीही भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा द्यावा, अशी मागणी केली आहे.