ठाकरे आणि शिंदे यांनी एकत्र यावे, शिवसेना खासदारांची इच्छा
उद्धव ठाकरे यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घेण्याबाबत दबाव वाढत असल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर असताना शिवसेनेच्या खासदारांची एक बैठक झाल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे १२ खासदार संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका शिवसेनेच्या काही खासदारांनी मांडल्याने या चर्चेला अधिक बळ मिळाले. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाणे यांच्या दिल्लीतील घरीच खासदारांची बैठक झाल्याची चर्चा आहे.
पण या चर्चा खोटी असल्याचे कृपाल तुमाणे यांनी म्हटले आहे. आपण गेल्या 6 दिवसांपासून नागपुरात आहोत, त्यामुळे मी दिल्लीत नसताना माझ्या घरी मीटिंग कशी होऊ शकते, असा सवाल विचारत ही चर्चा म्हणजे अफवा आहे, असा दावा तुमाणे यांनी केला आहे.
पण एकीकडे उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना सोबत घेण्यास नकार दिलेला असताना तुमाणे यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. "आमच्या सर्व खासदार आणि शिवसैनिक यांची इच्छा आहे की ठाकरे आणि शिंदे यांनी एकत्र यावे" अशी भूमिका तुमाणे यांनी मांडली आहे. पण याचवेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर नाराजी देखील व्यक्त केली आहे.
नाशिकमध्ये राऊत यांच्या सभेत एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द बोलले गेले, पण अशी टीका कुणीही कुणावर करु नये असे मत तुमाणे यांनी व्यक्त केले आहे.