राज्यात झालेल्या सत्ता संघर्षानंतर उद्धव ठाकरे, शिंदे गट आणि भाजप एकत्र येऊन युती होणार का, अशी चर्चा सुरु आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी आम्ही पाचवेळा बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांच्य़ाशी बोलण्याचा प्रश्न नसल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. तर उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यातील संघर्ष कोर्टात गेल्याने आता पॅचअपची शक्यता नसल्याची चर्चा सुरू झाली होती.
पण उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये समेट होणार का, अशी चर्चा सुरू झाली. आता या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी एबीपी माझा या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठा गौप्यस्फोट केला आहे. आपण शिवसेनेच्या खासदारांचे प्रवक्ते नाहीत तर एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आहोत, पण या खासदारांनी आपल्याला तशी विनंती केली तर आपण बोलू अशी माहिती त्यांनी दिली. पण याचबरोबर उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यात समेट होऊ शकते का, या प्रश्नावर आपल्या माहितीप्रमाणे समेट होऊ शकते, पण गाडी मानपानावर अडली आहे, आधी फोन कुणी करायचा यावर सारी गाडी अडली आहे, अशी माहिती केसरकर यांनी दिली आहे.
भाजपचे श्रेष्ठी आणि उद्धव ठाकरे यांच्यात आधी कुणी फोन करायचा यावर सारं काही अडलं आहे, अशी माहिती केसरकर यांनी दिल्याने आता पुन्हा युती होईल का, अशी चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटाने काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा असे आवाहन उद्धव ठाकरे यांना केले होते. पण त्यांनी सुरूवातीला ऐकले नाही पण आता उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत नाहीत, त्यामुळे शिंदे गटाच्या भूमिकेचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या गटातील दीपक केसरकर यांच्या या गौप्यस्फोटामुळे भाजप आणि शिवसेनेत बोलणी सुरू आहेत, अशी माहिती देखील समोर आली आहे. आता हा राजकीय तिढा सोडवण्यासाठी कोण पुढाकार घेऊन फोन करेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.