शिवसेनेमध्ये झालेल्या बंडाळीनंतर शिवसेनेचं आता पुढे काय हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटासह भाजपसोबत जात नवं सरकार स्थापन केलं तर दुसरीकडे महाविकास आघाडी पुढील सर्व निवडणुका एकत्र लढवणार असल्याचं माजी मुख्यमंत्रा एकनाथ शिंदे यांनी सांगितल होतं. महाविकास आघाडीला अनैसर्गिक युती म्हणत एकनाथ शिंदे यांनी आपला वेगळा गट तयार केला. यानंतर उध्दवन ठाकरेंनी महाविकास आघाडीमध्ये असतानादेखील आता संभाजी ब्रिगेड सोबत युती केली आहे. तशी घोषणाच संभाजी ब्रिगेड आणि उध्दव ठाकरे यांनी केली आहे.
"आपण एका विचाराने एकत्र आलो आहोत. गेल्या महिन्या-दोन महिन्यांत जे आपल्या विचारांचे आहेत आणि जे आपल्या विचारांच्या जवळपासही येणारे नाहीत असे लोक स्वत:हून मला येऊन सांगत आहेत की आता संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवं. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवं. मी स्वागत यासाठी केलं की आपण सगळेजण शिवप्रेमी आहोत. आपला आजपर्यंतचा इतिहास आहे की मराठ्यांना दुहीचा शाप गाडत आला आहे. आपण एकत्र येऊन एक नवीन इतिहास घडवू. या दुहीच्या शापालाच गाडून टाकू" असं वक्तव्य उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केलं.
शिवाय "गेल्या अनेक वर्षांपासून संभाजी ब्रिगेड ही सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी संस्था आहे. सध्या राज्यात ज्या पध्दतीचं राजकारण सुरू आहे, ज्यात लोकांचे प्रश्न सोडवले जात नाहीयेत. आणि ते सोडवायचे असतील तर राजकारणात येणं महत्वाचं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळातील प्रत्येक निवडणूक मग ती स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा असो किंवा लोकसभा असो, संभाजी ब्रिगेड ती लढवणार आहे आणि त्यासाठी शिवसेने सोबत आम्ही युती करत आहोत.", अशी माहिती संभाजी ब्रिगेडने पत्रकारांसमोर बोलताना दिली.
या नव्या युतीवर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील प्रतिक्रीया दिली आहे. "शिवसेनेसोबत युती करण्याचा त्यांचा जो निर्णय आहे त्याचे स्वागत आहे. संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचा विचार घेऊन मराठा समाजासाठी ही संघटना काम करत आहे. ज्या त्या संघटनांचा एक विचार असतो. सावरकर यांच्या विरोधात जी भूमिका घेतली हा त्यांचा विचार आहे आणि त्यांनी तो पाळावा. वेगवेगळ्या संघटनांचे वेगवेगळे विचार असू शकतात आमच्या सोबत आले म्हणजे त्यांनी त्यांचा विचार सोडले पाहिजे असे नाही. संभाजी ब्रिगेड एक लढाऊ संघटना आहे. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत होतो तेव्हा आम्ही आमचे विचार कुठे सोडले होते. औरंगाबाद नामांतराचा मुद्दा आता संपलेला आहे, आता त्याचं नामांतरण झालेलं आहे. त्यामुळे मागे कोणी त्याला विरोध केला त्याला आता अर्थ नाही. विरोधी पक्षाकडून सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले गेले आहेत. सरकार व्यवस्थित आणि सकारात्मक उत्तर देत नसेल तर त्याला आम्ही काय करणार.
आंदोलन करणं हे विरोधी पक्षाचं काम असते. सत्ताधारी पक्षाने आंदोलन का करावे आणि त्यांना ते शोभत नाही. विरोधी पक्ष आंदोलन करत असताना सत्ताधारी पक्षांनी अडवण्याच काम केले त्यामुळे संघर्ष झाला. जी मस्ती सत्ताधाऱ्यांची आहे अंगावर येणं आणि मारण्याची, ती मस्ती लवकरच महाराष्ट्र जिरवेल. आदित्य ठाकरे यांचं वय 32 वर्ष आहे आणि ते तरुण नेते आहेत. जे शिवसेनेतून गेलेले गद्दार आहेत ते त्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. आदित्य ठाकरे संपूर्ण राज्यभर फिरत असताना जे त्यांना प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा उठला आहे." अशी प्रतिक्रीया अंबादास दानवे यांनी दिली.