राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा मुद्दा सध्या राज्याच्या राजकारणात गाजतो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच याच मुद्द्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यामुळे लवकरच हा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण आता भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर यावरुन टीका केली आहे. राज्यात कोरोनामुळे मंदिरं बंद ठेवली जातात. तर दुसरीकडे विधिमंडळाचे अधिवेशन दोनच दिवसांचे केले जाते. आणि आता मुख्यमंत्री जर १२ आमदारांसाठी राज्यपालांना भेटायला जात असतील तर यापेक्षा दुर्दैव नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.
मुनगंटीवार यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी उत्तर दिले आहे. शिवसेना आणि भाजपची सत्ता असताना मुनगंटीवार यांनी १२ आमदारांच्या नियुक्तीला कधी आक्षेप घेतला नाही. पण आता विरोधी पक्षाचे सरकार आहे म्हणून टीका करायची, अशी अपेक्षा सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून नव्हती, असे खडसे यांनी म्हटले आहे.