Top Secrete : राज्यसभा निवडणूकीत मदत कुणाची? देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
राज्यसभा निवडणूकीत भाजपचा तिसरा उमेदवार कसा निवडून आला यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले टॉप सिक्रेट.;
राज्यसभा निवडणूकीत भाजपकडे आमदारांचे संख्याबळ नसतानाही तिसरा उमेदवार निवडून आला. त्यानंतर झालेल्या विधानपरिषद निवडणूक होताच राज्यात राजकीय भूकंप झाला. मात्र यामध्ये राज्यसभा निवडणूकीत शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाने भाजपला सहकार्य केल्याची शंका उपस्थित केली जात होती. मात्र राज्यसभा निवडणूकीत भाजपला एकनाथ शिंदे यांनी मदत केली का? यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ते इंडिया टुडेच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यसभा निवडणूकीच्या वेळी आम्ही जिंकलो. मात्र त्यामध्ये शिवसेनेचे जे लोक आमच्यासोबत आले आहेत. त्यापैकी एकही मत आम्हाला मिळाले नव्हते. यानंतर अँकरने तुम्हाला राष्ट्रवादीचे मत मिळाले का? असा सवाल केला. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी तसं कुठं म्हणतोय. कुणीही असू शकतं. काँग्रेसही असू शकतं, असं म्हणत राज्यसभा निवडणूकीत भाजपच्या तिसऱ्या जागेसाठी काँग्रेसने सहकार्य केल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
राज्यसभा निवडणूकीत सहा जागांसाठी 10 जून रोजी मतदान झाले. या निवडणूकीत भाजपचे धनंजय महाडिक, पियुष गोयल, अनिल बोंडे हे विजयी झाले. मात्र या लढतीत शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाला. त्यामुळे भाजपकडे अपेक्षित संख्याबळ नसतानाही भाजपला तिसऱ्या जागेसाठी कुणी सहकार्य केले? हे गुलदस्त्यात होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी अखेर राज्यसभा निवडणूकीचे टॉप सिक्रेट फोडले आहे.