शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून ईडीकडून आपला छळ होत असल्याचे पत्र लिहून म्हटले होते. तर महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रातून केला होता. त्यानंतर राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांनी राज्य सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असून आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून केला. त्यानंतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.
नवाब मलिक म्हणाले की, केंद्रीय यंत्रणांचा वापर करून आम्हाला दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर जेवढा दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील तेवढ्याच क्षमतेने पुन्हा उभा राहू. महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकत नाही, असे मलिक यांनी सांगितले. तर केंद्रातील वरिष्ठ मंत्र्यांचे काय चालले आहे? हे देखील आम्हाला माहीत आहे, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.
राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपला महाविकास आघाडी सरकार पाडायचे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या तीनपैकी एक पक्ष त्यांच्यासोबत जाण्याची परिस्थिती निर्माण करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या नेत्यांच्या मागे ईडी लावली जात आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मागेही ईडी लावली जात आहे. त्यामुळे भाजपला असे वाटत आहे की, ईडीला घाबरून सरकारमधून बाहेर पडतील. पण तो भाजपचा मोठा गैरसमज आहे, असे मलिक यांनी यावेळी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी कितीही सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, तरी राज्यातलं सरकार आमच्या ताब्यात राहणार आह. तसेच राज्यच काय आम्ही केंद्रातील सरकारही ताब्यात घेऊ, असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.