मुस्लीम आणि दलितांची नावे मतदार याद्यांमधून गायब; मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा गौप्यस्फोट

Update: 2021-10-19 11:17 GMT

ठाणे : मुस्लीम आणि दलितांची नावे जाणीवपूर्वक मतदार याद्यांमधून कापली जात असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. पुढील वर्षी ठाणे महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययावत करण्यात येत आहेत. मात्र, मुंब्रा-कळवा मतदारसंघातील अनेक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

डॉ. आव्हाड यांनी सांगितले की, महानगरपालिका निवडणुकांच्या आधी फक्त मुंब्रा- कळव्याच्याच नव्हे तर सबंध महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ करण्यात आलेला आहे. मुंब्रा येथे 20 ते 30 हजार मतदारांची नावे कापण्यात आलेली आहेत. त्यासाठी स्थलांतरण असा शेरा मारण्यात आलेला असला तरी सद्यस्थितीमध्ये ते मतदार त्याच ठिकाणी वास्तव्यास आहेत. ही नावे गाळण्यामागे जबाबदार कोण आहे?, याचा विचार केल्यास ही जबाबदारी जिल्हाधिकार्‍यांची आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हे काम होत असते. म्हणून आमची मागणी आहे की, मतदार याद्यांची फेरतपासणी करावी आणि जे चुकीच्या पद्धतीने स्थलांतरीत दाखविण्यात आलेले आहेत. ते स्थलांतरण रद्द करुन संबधित मतदारांना पूर्ववत यादीमध्ये समाविष्ट करावेत, अशी सूचना डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

दरम्यान,संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकारच काढून घेण्याचा प्रयत्न प्रशासकीय अधिकारी करीत आहेत. खास करून मुस्लीम आणि दलितांची नावे कापली जात आहेत, असा आरोपही डॉ.आव्हाड यांनी केला.

Tags:    

Similar News