राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील सभेनंतर राज्यात भोंग्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. तर राज्यातील मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत राज ठाकरे यांनी राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. त्यावर प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भोंगे बंदीचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात टोलावून दिला.
राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे काढले नाही तर मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. तर आज राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. त्यापार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे लोकसत्ताच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी भोंगेबंदीबाबत महत्वाचे विधान केले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, मला तरी भोंगा हा मुद्दा गाजलेला वाटत नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल संपुर्ण देशासाठी आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात राज्याच्या गृहमंत्र्यांनी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीतही भोंगेबंदीबाबत केंद्र सरकारने कायदा करावा अशी भुमिका घेण्यात आली होती. तर केंद्र सरकारने देशभर नोटबंदी केली, लॉकडाऊन केला त्यामुळे आता भोंगेबंदीबाबत निर्णय घ्यायचा असेल तर तो केंद्र सरकारने घ्यावा, असं म्हणत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भोंगे बंदीबाबतचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात टोलावला.
उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने भोंगे काढण्याबाबत भुमिका घेतली आहे. मग महाराष्ट्रातील सरकार अशी भुमिका का घेत नाही? असा सवाल करण्यात आला. त्यावर उत्तर देतांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, उत्तरप्रदेशमध्ये कोरोना काळात गंगेच्या प्रवाहात अनेक प्रेतं वाहून आले होते. 70 पेक्षा अधिक मुलांचा ऑक्सिजनविना तडफडून मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील हे भीषण वास्तव आहे. त्यामुळे मला माझ्या जनतेच्या जीवाची पर्वा आहे, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, उत्तरप्रदेशात भोंगे हटवण्यात आले आहेत. मात्र आता ज्या भोंग्यांना परवानगी नव्हती ते भोंगे परवानगी घेतील आणि पुन्हा भोंगे चढवले जातील. त्यामुळे या प्रकरणात अजानतेपणाने टीका करणारांना हे समजत नाही की, खरा मुद्दा अजान नसून आवाज आहे, असा टोला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना नाव न घेता लगावला.
तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, मला हा भोंग्यांचा मुद्दा गौण वाटत आहे. कारण राज्याला पुढे न्यायचे आहे, राज्यात गुंतवणूक वाढवायची आहे. थांबलेले अर्थचक्र पुन्हा फिरवायचे आहे, त्यामुळे सध्या राज्यापुढे असलेले आव्हान लक्षात घेता भोंग्याचा विषय गौण आहे, अशी भुमिका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतली.
2017 मध्ये भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना युती होणार होती, असे वक्तव्य भाजपने केले. त्यावर प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, त्यावेळी शिवसेनेला तरी अशी कुठली युती होणार असल्याबाबत काही माहिती नव्हती. तसेच यामध्ये छुपं काही चाललं आहे ते माहित नव्हते. त्यामुळे तीन पक्षांच्या युतीबाबतच्या चर्चा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फेटाळून लावल्या.
भाजपने बाळासाहेबांना वेळोवेळी फसवले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे भाजपवर बोलताना म्हणाले की, माझ्यावर अनेकदा आरोप होतो की, आत्ताची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची नाही. तर हे खरे आहे. कारण बाळासाहेब हे भोळे होते. त्यामुळे भाजपने बाळासाहेबांना अनेकदा फसवल्याचे मी माझ्या डोळ्याने पाहिल्याचा गंभीर आरोप उध्दव ठाकरे यांनी केला. त्यामुळे मी धुर्तपणे वागतो, असे उध्दव ठाकरे म्हणाले.