भाजपवासी झालेले माथेरान येथील दहा नगरसेवक अपात्र ; पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई

Update: 2021-10-30 04:39 GMT

माथेरान : माथेरान नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर माथेरानमध्ये मोठी राजकीय घडामोडी समोर आली आहे, मे 2021 मध्ये माथेरान नगरपरिषदेतील शिवसेनेतून भाजपात गेलेल्या दहा नगरसेवकांना पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र ठरवण्यात आले आहे.

27 मे 2021 रोजी भाजपमध्ये थेट प्रवेश केलेल्या नगरसेवकांविरोधात माथेरान नगरपरिषदेचे शिवसेना पक्षाचे गटनेते प्रसाद सावंत यांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे पक्षांतर बंदी कायद्यानुसार तक्रार दाखल केली होती. 27 ऑगस्ट 2021 रोजी याप्रकरणी अखेरची सुनावणी जिल्हाधिकारी महिंद्र कल्याणकर यांच्यासमोर झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी निर्णय राखून ठेवला होता. अखेर काल (दि. 29) त्या 10 भाजपवासी नगरसेवकांना रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहे. तसे आदेश सर्व नगरसेवकांना पोस्टांने पाठविण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी कोल्हापूर येथे भाजपात जाहिर प्रवेश केला होता. अपात्र ठरविलेल्या नगरसेवकांमध्ये आकाश कन्हैया चौधरी, राकेश नरेंद्र चौधरी, संदीप कदम, सोनम दाभेकर , प्रतिभा घावरे, प्रीयंका कदम, ज्योती सोनावळे, चंद्रकांत जाधव यांचा समावेश आहे.

Tags:    

Similar News