मिलिंद नार्वेकर शिंदे गटात प्रवेश करण्याची चर्चा, अखेर मिलिंद नार्वेकर यांनी केलं ट्वीट

एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर 41 आमदार आणि 12 खासदारही शिंदे गटात सामील झाले. त्यापाठोपाठ बाळासाहेब ठाकरे यांची सावली बनून असलेले चंपासिंग थापा हे सुध्दा उध्दव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर आता उध्दव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले मिलिंद नार्वेकर हेसुध्दा शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यापार्श्वभुमीवर मिलिंद नार्वेकर यांनी ट्वीट केले आहे.;

Update: 2022-10-02 01:39 GMT

शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी चंपासिंग थापा यांच्यापाठोपाठ मिलिंद नार्वेकर हेसुध्दा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे म्हटले. त्यानंतर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. त्यावर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. त्याबरोबरच मिलिंद नार्वेकर सध्या नेमके कुठे आहेत? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यापार्श्वभुमीवर अखेर मिलिंद नार्वेकर यांनी ट्वीट केले आहे.

उध्दव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर सध्या उध्दव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे दिसत नाही. त्यातच पावसाळी अधिवेशनात बोलताना राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे म्हणाले होते की, आम्ही पुढच्या दाराने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र जेव्हा भेट घेतली तेव्हा शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर तिथे असल्याचे पहायला मिळाले. तेव्हापासून मिलिंद नार्वेकर शिवसेना सोडणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर पुन्हा गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले की, आमच्यावर 50 खोके घेतल्याचा आरोप होत आहे. बरं आम्ही 50 खोके घेतले असं समजू. पण ज्या चंपासिंग थापा याने आयुष्य बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी अर्पण केले. त्यांनी काय केलं? आता चंपासिंग आले पुढे मिलिंद नार्वेकर येतील, असं वक्तव्य केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात मिलिंद नार्वेकर यांच्याविषयी चर्चा रंगल्या आहेत.

यावर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मिलिंद नार्वेकर यांच्यासारखे नेते असं काही करतील यावर त्यांचा विश्वास नाही. ज्यावेळी राज ठाकरे आणि नारायण राणे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपातूनही मिलिंद नार्वेकर हे तावून सलाखून निघाले आहेत. तसंच ते सध्या तिरूपती या अध्यात्मिक संस्थेवर असल्याने त्यांच्या सद्बुध्दी नुसार ते असं काही करणार नाहीत, असा विश्वास किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला.

मिलिंद नार्वेकर यांनी ट्वीट करून म्हटले की, मी भाग्यवान आहे. कारण मला सरन्यायाधिश उदय लळीत, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि तिरुमला तिरुपती देवस्थानचे प्रमुख सुब्बा रेड्डी यांच्यासोबत व्यंकटेश स्वामी मंदिरात ब्रम्होत्सवाच्या पाचव्या दिवशी गरुड वाहन पुजेचा साक्षीदार होता आले.

सध्या राज्यात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. शिंदे गटानेही आपला दुसरा टिजर लाँच केला आहे. तर उध्दव ठाकरे गटानेही प्रत्युत्तर दिले आहे. त्यापार्श्वभुमीवर शिवसेनेचे सचिव आणि उध्दव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक असलेले मिलिंद नार्वेकर या सगळ्या घडामोडींमध्ये कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे मिलिंद नार्वेकर हे उध्दव ठाकरे यांची साथ सोडू शकतात? अशी चर्चा होती. त्यातच गुलाबराव पाटील यांनी केलेल्या ट्वीटमुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकर शिंदे गटात प्रवेश करणार का? हे मात्र अधिकृतरित्या समजलेले नाही.

Tags:    

Similar News