मोदी सरकारच्या गॅस सिलिंडरच्या वापरावर मर्यादा, सुप्रिया सुळे यांचा घणाघात
ऐन नवरात्री उत्सवाच्या काळात मोदी सरकारने गॅस सिलिंडरच्या वापरावर मर्यादा आणणारा निर्णय घेतला आहे. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली.;
सध्या नवरात्री उत्सव सुरू आहे. त्यातच मोदी सरकारने उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून 12 सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकावर टीका केली. सुप्रिया सुळे या उस्मानाबाद येथे बोलत होत्या.
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ऐन नवरात्री उत्सवाच्या काळात सरकारने महिलांच्या हिताचा निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र एकीकडे गॅसच्या दरात वाढ करायची आणि दुसरीकडे गॅस सिलिंडरच्या वापरावर मर्यादा आणायच्या, यातून सरकारचा असंवेदनशीलपणा दिसून येत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या, मोदी सरकारच्या नव्या नियमानुसार उज्वला गॅस योजनेचे लाभार्थी असलेल्या अनुदानित ग्राहकांना वर्षाला 12 तर दोघांसाठीही महिन्याचा कोटा 2 सिलिंडर इतका करून गृहिणींच्या चिंतेत भर घातली आहे. तसेच गॅस सिलिंडरची आवश्यकता असलेल्या ग्राहकांना कंपनीच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. तसेच कागदपत्र सादर केल्यानंतरच त्यांना अतिरिक्त गॅस भरून मिळेल, असे आदेश दिले आहेत. मोदी सरकार एकीकडे ई गव्हर्नन्सचा गाजावाजा करत आहे. तर दुसरीकडे नागरिकांना कागदपत्र गोळा करायला लावून खटाटोप करायला सांगत आहे. त्यामुळे सरकारची कार्यपध्दती कुचकामी ठरत असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सरकारने ऐन नवरात्री उत्सव आणि दिवाळीच्या पार्श्वभुमीवर अशा प्रकारचा निर्णय घेऊन सरकार महिलांची चेष्टा करत आहे. त्यामुळे संसाराचा रहाटगाडा कसा चालवायचा? असा प्रश्न महिलांना पडला असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
काही महिला घरगुती डबे देत असतात, काही महिला पेईंग गेस्टला डबा देऊन तर काहींचे मोठे कुटूंब असते. त्यामुळे अशा प्रकारे मर्यादा आणून सरकार जेवणावरच नाही तर सण-उत्सव साजरा करण्याच्या मुलभूत हक्कांवरच गदा आणत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली.