एका व्यक्तीच्या वक्तव्यामुळे संपूर्ण पेशा बदनाम होतो, सुप्रिया सुळे यांचा प्रसाद लाड यांच्यावर घणाघात
प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचा दावा केला होता. त्यावरून राज्यात वादंग निर्माण झाले आहे. त्यापार्श्वभुमीवर सुप्रिया सुळे यांनी प्रसाद लाड यांच्यावर टीका केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला होता, असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केले होते. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका केली. सुप्रिया सुळे या मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या तेराव्या शिक्षण परिषदेत बोलत होत्या.
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमच्या पेशातील काही लोकांचा इतिहास कच्चा आहे. आमदार प्रसाद लाड म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म तिसरी किंवा चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात होता, हे माहिती असेल. पण आमच्यातील काही जणांना माहिती नाही. मात्र अशा प्रकारे काही जण वक्तव्य करतात आणि त्यामुळे संपूर्ण पेशा बदनाम होतो, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी प्रसाद लाड यांच्यावर केली.
शिक्षण परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी शिक्षण धोरणावर वक्तव्य केले. तसेच शिक्षकांनी विज्ञाननिष्ठ व्हावे, असं मत व्यक्त केले. अंधश्रध्दा बाळगू नये, असं मत व्यक्त केले. याबरोबरच पुढील वर्षी होणारी शिक्षण परिषद संविधानावर आधारित असेल, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.