जालन्यात राष्ट्रवादीकडून काँग्रेसला झटका, सुधाकर निकाळजेंचा समर्थकांसह राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र असलेल्या काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसनेच एकमेकांना शह देण्याचा सापटा लावला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर निकाळजे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. सुधाकर निकाळजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशाने जालना जिल्ह्यात पक्ष संघटना आणखी बळकट करण्याचा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहरी भागात आपला प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीने महत्वाची पाऊलं उचलली आहेत. उल्हासनगर, भिवंडी यासारख्या शहरात राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढविण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. अशीच जालना जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर टाकत आहोत, असं पाटील यांनी नवीन सदस्यांना सांगितले.
आपला पक्ष हा शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचा पक्ष आहे. या विचारांना धरूनच आपण सर्वांनी एकत्र मिळून पुढील काळात जालना जिल्ह्यात अधिक जोमाने काम करुया, असे आवाहन टोपे यांनी केले. आगामी निवडणुकीमध्ये आपण जालना जिल्ह्यात केलेल्या समाजकार्याचा पक्षाला नक्कीच फायदा होईल असा विश्वास राजेश टोपे यांनी यावेळी व्यक्त केला.