मुंबई : काश्मीर खोर्यातील हत्या प्रकरणावरून शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.'सध्या भाजप सर्वत्र दिसत आहे फक्त काश्मीर खोऱ्यामध्ये निरपराधांच्या हत्या सुरू असताना केंद्र सरकार , भाजपचे अस्तित्व दिसत नाही असा घणाघात सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. भाजप कार्यकर्त्यांचे अस्तित्व क्रूज वरील रेव्ह पार्ट्यांत, जसे ईडी, आयटीत दिसते तसे ते कश्मीर खोऱ्यामध्ये दिसावे.' असा चिमटा देखील सामनातून काढण्यात आला आहे.
तेव्हा धडपड्या कार्यकर्त्यांनी छातीचा कोट करून काश्मिरातही जावे
सोबतच सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की , 'आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना 'शांत' करण्यासाठी खासगी आर्मी उभारावी असे जाहीर सल्लेही त्या पक्षाचे नेते आपल्या कार्यकर्त्यांना देतात. काश्मिर खोऱ्यात सध्या निरपराध पंडित आणि शिखांच्या हत्या केल्या जात आहेत तेव्हा या धडपड्या कार्यकर्त्यांनी छातीचा कोट करून काश्मिरातही जावे त्यांची वाहव्वा होईल' असं सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
श्रीनगरला शाळेच्या महिला प्राचार्यांना अतिरेक्यांना ठार केले, त्या प्राचार्या काश्मीर शीख समाजाच्या होत्या. दीपक चांद नावाच्या शिक्षकास गोळ्या घालून मारले ते काश्मिरी पंडित होते, हिंदू शीखच नाही तर पोलिस खात्यात कर्तव्य बजावणाऱ्या मुस्लिम अधिकाऱ्यांनाही अतिरेक्यांकडून लक्ष केले जाते. नोटाबंदी केल्याने दहशतवाद थांबेल असे केंद्र सरकार सांगत होते. नोटबंदीमुळे अतिरेक्यांची आर्थिक रसद तुटेल असे सांगितले गेले, मात्र ते खरे ठरले नाही असं सामनातून म्हटलं आहे.