आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर भिरकावला दगड, सरकारकडून सुरक्षेबाबत दुर्लक्ष केल्याचा शिवसेनेचा आरोप
राज्यभर आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून शिंदे गटावर (Eknath Shinde group) हल्लाबोल करत आहेत. त्यातच औरंगाबाद जिल्ह्यात आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या वेळी आधी स्टेजवर आणि त्यानंतर त्यांच्या गाडीवर दगड भिरकावण्यात आला.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्यभर शिवसंवाद यात्रा सुरु केली. त्यातच आता ही शिवसंवाद यात्रा (Shivsanvad Yatra) औरंगाबाद जिल्ह्यात आहे. या शिवसंवाद यात्रेत आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील महालगावमध्ये (Mahalgaon) सभा आयोजित केली होती. दरम्यान या गावकऱ्यांनी माता रमाई जयंतीची मिरवणूक काढली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी डीजे बंद करण्यास सांगितल्याने संतप्त झालेल्या जमावाने गोंधळ घालण्यास सुरु केला. त्यातच आदित्य ठाकरे स्टेजवर असताना आणि चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचे भाषण सुरु असताना जमावातून स्टेजवर दगड भिरकावला. मात्र यानंतर सभा सुरुच राहिली. मात्र सभा संपल्यानंतर आदित्य ठाकरे पुढील प्रवासासाठी निघताना जमावाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी तणावपूर्ण वातावरण झाले होते.
यावेळी संतप्त जमावाकडून आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हाताने ठोसे मारण्यात आले. तसेच एक दगडही भिरकावण्यात आला. त्यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. मात्र सुरक्षारक्षकांनी आदित्य ठाकरे यांना सुखरूप बाहेर काढले.
यानंतर शिवसेना नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकारवर टीका केली. यामध्ये दानवे म्हणाले, आमच्यावर दगड आला. त्यानंतर प्रवास करताना देखील आमच्या गाडीवर दगड आला. त्यामुळे मुद्दाम या मॉबमध्ये दलित समाज आणि हिंदूंमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न चालू होता. याचा आम्ही निषेध करतो. आदित्य ठाकरे यांची सभा उधळण्याचा प्रयत्न झाला. तसेच सरकारकडून आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केला.