"आपण मुख्यमंत्री नाही हे आपले सहकारी आणि जनतेने गेल्या दोन वर्षात जाणवू दिले नाही" असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई मध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपची सत्ता येईल असा दावा त्यांनी केला.
या कार्यक्रमाला भाजपचे नेते गणेश नाईक देखील उपस्थित होते. भाजपचे नेते गणेश नाईक, मंदा म्हात्रे आणि इतर नेत्यांनी आपण मुख्यमंत्री नाही हे कधी जाणवू दिले नाही, त्यामुळे आजही आपण मुख्यमंत्री आहोत असंच आपल्याला वाटतं असं वक्तव्य देखील देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्याचबरोबर कोणत्या पदावर आहे त्याला महत्व नाही तर आपण काम कसं करतोय हे महत्त्वाचा आहे आणि विरोधी पक्षनेते म्हणून आपण उत्तम काम करत असल्याचं फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसात भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी पक्षाबद्दल आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मंदा म्हात्रे यांच्या कार्याचे भरभरून कौतुक देखील केले.