जिनांच्या थडग्यावर डोकं टेकवणाऱ्या औलादीकडून आम्ही हिंदुत्व शिकायचं? उद्धव ठाकरेंचा भाजपाला खडा सवाल
कुणाच्यातरी थडग्यावर जाऊन बोलायचं की हे थडगं बघा कसं सजवलं. पाकिस्तानात जाऊन जिनांच्या थडग्यावर डोकं टेकवणारी तुमची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकायचं? नवाज शरीफच्या वाढदिवसाला न बोलवता जाऊन केक खाणारा तुमचा नेता आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार? काश्मीरमध्ये सत्तेच्या लोभापायी दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या मुफ्तीच्या पक्षाशी तुम्ही साटंलोटं करता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता? अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटाला शिवतिर्थावरु खडेबोल सुनावले.
मागील दोन महीन्यापासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन राज्यात राजकारण रंगलं होते. कोर्टबाजीनंतर अखेर मुंबईच्या शिवाजी पार्कवर सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा पार
पडला तर त्याचवेळी दुसरीकडे बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. महागाईच्या मुद्द्यावरुन भाजपवर टिका करत उध्दव ठाकरे म्हणाले, तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व करत गायीवर बोलता, महागाईवर बोला ना. महागाईच्या वेदना तुम्हाला जाणवू नयेत, म्हणून हिंदुत्वाचा डोस द्यायचा. तुम्ही महागाईवर बोललात, तर जय श्रीराम म्हणतील. ह्रदयात राम आणि हाताला काम पाहिजे. पण हे महागाईवर बोलत नाहीत असे ते म्हणाले.
शिंदे गटाचा सुरवातीला अनुल्लेख करत ठाकरे म्हणाले, ही गर्दी विकत मिळत नाही. हे ओरबाडून घेता येत नाही. ही कोरडी गर्दी नाही. अंत:करण ओलं असलेल्या माझ्या जिवाभावाच्या शिवसैनिकांची गर्दी आहे. याच मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मी तुम्हाला नतमस्तक झालो होतो. कोणत्याही अनुभवाशिवाय तुमच्या प्रेमाच्या जोरावर कारभार केला. अजूनही डॉक्टरांनी मला वाकण्याची परवानगी दिलेली नाही. पण तुमच्यासमोर नतमस्तक झाल्याशिवाय मी पुढे जाऊच शकत नाही .ज्यांना आपण सगळंकाही दिलं, मंत्रीपदं दिली, आमदारक्या, खासदारक्या दिल्या.. ते नाराज होऊन गेले. पण ज्यांना मी काही देऊ शकलो नाही, ते तुम्ही सर्व आजही माझ्यासोबत निष्ठेने आहात हे माझं नशीब आहे. ही शिवसेना एकट्या-दुकट्याची नाही. ही शिवसेना तुमच्या मर्द आणि एकनिष्ठ शिवसैनिकांची आहे. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात, तोपर्यंत मी शिवसेना पक्षप्रमुख आहे. तुम्ही ठरवणार आहात की मी पक्षप्रमुख राहायचं की नाही. एकाही एकनिष्ठानं सांगावं की निघून जा, मी आत्ता निघून जाईन. पण तुमच्यापैकी एकानं सांगायला हवं. गद्दारांनी सांगायचं, असंही ते म्हणाले.
शिंदे गटावर गद्दारीचा आरोप करत ठाकरे पुढे म्हणाले, त्यांना गद्दारच म्हणणार. मंत्रीपदं तुमच्या बुडाला चिकटलेली असली, तरी ती काही काळापुरती आहेत. पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मीतरी पुसला जाणार नाही. तेव्हा अनेकांना प्रश्न पडला की आता शिवसेनेचं काय होणार? माझ्या मनात चिंता नव्हती. आज हे शिवतीर्थ बघितल्यावर त्यांच्या मनात पुन्हा प्रश्न पडला की अरे बापरे, गद्दारांचं कसं होणार? इथे एकही माणूस भाड्याने आणलेला नाही. तासाची बोली लावून आणलेला नाही असही त्यांनी सांगितले.
यानंतर रावणदहन होणार आहे. पण यावेळचा रावण वेगळा आहे. आत्तापर्यंत रावण १० तोंडांचा होता. आता ५० खोक्यांचा रावण झाला आहे. हा खोकासूर आहे. काळ बदलतो, तसा रावणही बदलतो. वाईट आणि संतापही एका गोष्टीचा वाटतो, की जेव्हा मी माझ्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात होतो, माझी बोटंही हलत नव्हती, शरीर निश्चल पडलं होतं, तेव्हा ज्यांच्यावर मी जबाबदारी दिली होती, ते कटाप्पा.. म्हणजे कट करणारे अप्पा ते कटाप्पा.. ते कट करत होते की हा पुन्हा उभा राहूच शकणार नाही. पण त्यांना कल्पना नाही की हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. तुम्ही आई जगदंबेच्या शक्तीशी पंगा घेतला आहे. देव तुमचं भलं करो. ही धमकी नाही, तेजाचा शाप आहे तो असे ठाकरे म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कायदा चांगला कळतो. हा टोमणा नाही. त्यांना कायद्यातलं चांगलं कळतं. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. जाताना बोलून गेले होते की मी पुन्हा येईन. दीड दिवस आले. दिड दिवसात विसर्जन झालं. मनावर दगड ठेवून उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा आले. मी खरं बोलतोय. मी कुठे टोमणा मारतोय. आता ते म्हणतायत कायद्याच्या चौकटीत बोला, नाहीतर कायदा आपलं काम करेल. देवेंद्रजी, तुम्ही गृहमंत्री आहात. पण आम्हाला सगळ्यांना कायदा कळतो. कायदा सगळ्यांनी पाळायला हवा. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही ही डुकरं पाळायची, हे नाही चालणार असंही ठाकरेंनी सुनावलं.
माणसाची हाव किती असते? इतरांना बाजूला सारून तुला आमदार केलं मंत्री केलं, आता मुख्यमंत्री झाला. पण तरी शिवसेनाप्रमुख व्हायचंय यांना. शिवसेनाप्रमुख म्हणून त्याला स्वीकारणार का तुम्ही? आहे का लायकी त्याची? एकतर स्वत:च्या वडिलांच्या नावाने मतं मागण्याची हिंमत नाही. बाप चोरणारी औलाद. स्वत:च्या वडिलांचा तरी विचार करायचा. त्यांना वाटेल काय हे दिवटं कार्ट माझ्या पोटी जन्माला आलं जे माझ्याऐवजी दुसऱ्याच्या बापाचं नाव लावतंय असाही ठाकरेंनी आरोप केला.
जोपर्यंत शांत आहेत, तोपर्यंत त्यांना शांत राहू द्या - उद्धव ठाकरे
मी सांगतो शांत राहा, म्हणून हे सगळे शांत आहेत. जोपर्यंत शांत आहेत, तोपर्यंत त्यांना शांत राहू द्या. पिसाळायला लावू नका. जर शिवसैनिकावर अन्याय कराल, तर तो आम्ही सहन करणार नाही. तुमचा कायदा तुमच्या मांडीवर कुरवाळत बसावा.पोलिसांकडून त्या गटात जाण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत. हा तुमचा कायदा? एवढंच नाही, तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही धमकी दिली जातेय की त्या गटात जा नाहीतर तुमच्या केसेस काढतो. काय सलून काढलंय तुम्ही केसेस काढण्याचं? असंही ठाकरे म्हणाले.
अंकिता भंडारीचे काय झाले ?
आज मोहन भागवत म्हणाले स्त्रीशक्ती आणि पुरुष यांच्यात समानता असायला हवी. पण त्यांना मला विचारायचंय, महिला शक्तीचा आदर ठेवताना उत्तराखंडमध्ये पवनी नावाच्या जिल्ह्यात अंकिता भंडारी नावाच्या १९ वर्षांच्या मुलीचा खून झाला. तिथे एका रिसॉर्टच्या बाजूला तिचा मृतदेह आढळला. ते रिसॉर्ट भाजपाच्या स्थानिक नेत्याचं आहे. हा महिलाशक्तीचा आदर.. तो हॉटेलमालक त्या अंकिताला येणाऱ्या-जाणाऱ्यांसोबत काही करण्यास सांगत होता. तिने नकार दिला. झाला तिचा खून. कुठे आहे महिला शक्तीचा आदर? मोहन भागवत मध्ये मशिदीत जाऊन आले. काय हिंदुत्व सोडलं? का मिंधे गटानं नमाज पढायला सुरुवात केली? मोहन भागवत संवाद करायला गेले होते. तेव्हा मुसलमानांनीच सांगितलं की मोहन भागवत हे राष्ट्रपिता आहेत. आम्ही सांगितलं मोहन भागवतांना राष्ट्रपती करा, तुम्ही ऐकलं नाही. आता मुसलमानांनी सांगितलं की ते राष्ट्रपिता आहेत. ते मुसलमानांसोबत बोलायला गेले तर त्यांचं राष्ट्रकार्य सुरू आहे, पण आम्ही काँग्रेससोबत गेलो तर हिंदुत्व सोडलं. कुठले धागेदोरे कशाशी जोडता असंही ठाकरे म्हणाले.
..तर इतर लोक महिलाशक्तीचा काय आदर राखणार?
बिल्किस बानो गुजरात दंगलीमध्ये गर्भवती होती. तिच्यावर बलात्कार झाला. तिच्या डोळ्यांसमोर तिच्या चिमुकलीचा खून करण्यात आला. आरोपी शिक्षा भोगत होते. गुजरात सरकारने त्यांना सोडून दिलं. एवढंच नाही, गावी गेल्यावर त्यांचा स्वागत सत्कार केला. या गोष्टी तुमच्या पक्षात घडत असतील, तर इतर लोक महिलाशक्तीचा काय आदर राखणार?
पाकव्याप्त काश्मीरमधला एक इंचही तुकडा परत घेऊ शकला नाहीत. चीन लेह, लडाखमध्ये घुसतंय. ती जमीन घेऊन दाखवा. आम्ही तुम्हाल डोक्यावर घेऊन नाचू, हे कशाला हवेत गद्दार. गद्दारांच्या पालखीत बसून कशाला मिरवताय? पण तिकडे शेपट्या घालायचे आणि इकडे येऊन पंजे काढायचे ही काय मर्दुमकी आहे? असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या, कीजिनांच्या थडग्यावर डोकं टेकवणाऱ्या औलादीकडून आम्ही हिंदुत्व शिकायचं? उद्धव ठाकरेंचा भाजपाला खडा सवाल
माझं आव्हान आहे. एकच व्यासपीठ. तुम्ही भाजपाची स्क्रिप्ट न घेता भाषण करून दाखवायचं. मी मुख्यमंत्री असताना ४-५ पत्रकार परिषदा झाल्या. माझ्या बाजूला अजित पवार बसायचे. कधीच त्यांनी माझ्यासमोरचा माईक खेचला नव्हता. माझ्या कानात माझं उत्तर सांगितलं नव्हतं. काँग्रेस-राष्ट्रवादीनं मान-सन्मान देऊन आपली सोबत केली आहे. सरकार झालं, तेव्हा अनेकांनी सांगितलं की ते काँग्रेस बघा..काहीतरी गडबड आहे. शरद पवार तुम्हाला माहिती आहे.. नीट लक्ष ठेवा हां… अडीच वर्ष त्यांच्याकडे लक्ष ठेवता ठेवता हेच निघाले.. मग गद्दार कोण?
चला एकदा सगळ्या हिंदुत्ववाद्यांनी एका व्यासपीठावर यावं. त्यांनी त्यांचं हिंदुत्व सांगावं. मी माझं वडिलोपार्जित हिंदुत्व सांगतो. शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं की आमचं हिंदुत्व शेंडीधारी नसून राष्ट्रीयत्वाशी जोडलं गेलेलं आहे. मग व्याख्या स्पष्ट आहे. विचार सोडले, विचार सोडले म्हणत आहेत. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा सांगितलं आहे की जो या देशावर प्रेम करतो तो मुसलमान असला तरी आमचा आहे. प्रत्येकानं आपापला धर्म आपल्या घरात ठेवावा, असं उध्दव ठाकरे म्हणाले.
देशातली लोकशाही जिवंत राहते की नाही हा प्रश्न निर्माण झालाय. नड्डा म्हणाले की शिवसेना संपत चालली आहे. देशात दुसरे कोणते पक्ष शिल्लक राहणार नाहीत. तुम्हाला सावधानतेचा इशारा देतोय. याचा अर्थ देश हुकुमशाहीकडे चालला आहे. देशात पुन्हा गुलामगिरी येऊ शकते. तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, जे जे देशप्रेमी असतील, त्यांनी एकत्र येऊन देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची गरज आहे, असे उध्दव ठाकरेंनी शेवटी सांगितलं.