Shivsena Vs Shivsena : धनुष्यबाण गोठवला जाणार का? adv.उज्वल निकम यांनी दिले उत्तर
राज्यात शिवसेना विरुध्द शिवसेना संघर्ष रंगला आहे. धनुष्यबाण आमचाच असा दावा दोन्ही गटाकडून केला जात आहे. त्यापार्श्वभुमीवर धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले जाणार का? याबाबत ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी कायद्याची बाजू मांडली आहे.;
राज्यातील शिवसेना विरुध्द शिवसेना संघर्ष तीव्र झाला आहे. त्यातच निवडणूक आयोगाने कागदपत्र सादर करण्याची मुदत आज (7 ऑक्टोबर) संपली. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्ह कुणाला देणार? याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यातच शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून धनुष्यबाण आमचाच असल्याचा दावा केला आहे. या पत्रात म्हटले आहे की, अंधेरी पुर्व पोटनिवडणूकीत ठाकरे गटाकडून धनुष्यबाण चिन्हाचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाबाबत तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली आहे. याबद्दल टीव्ही 9 या वृत्तवाहिनीशी बोलताना अंधेरी पुर्व विधानसभा पोटनिवडणूकीत धनुष्यबाण हे चिन्ह एका परिस्थितीत ठाकरे गटाकडेच राहण्याची शक्यता असल्याचे म्हटले.
उज्वल निकम म्हणाले, निवडणूक आयोगासमोर हा वाद दोन भागात सुरू आहे. दोन्ही गटाकडून शिवसेना आणि धनुष्यबाण आपलाच असल्याचा दावा केला जात आहे. निवडणूक आयोगाने 7 ऑक्टोबरपर्यंत दोन्ही गटांना कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र दोन्ही गटांनी कागदपत्र सादर केले की नाही? हे निवडणूक आयोगाने जाहीर केले नाही. याचा अर्थ असा होतो की, हा वाद निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे.
उज्वल निकम म्हणाले की, अजून पुरावे नोंदणीचे काम पुर्ण झाले नाही. त्याआधीच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणूकीत शिंदे गट आणि ठाकरे गट हे दोन्हीही गट उमेदवार उभे करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र ठाकरे गटाने उमेदवार दिला आणि शिंदे गटाने उमेदवार दिला नाही, तर धनुष्यबाण ठाकरे गटाला मिळेल. मात्र यानंतर हा वाद पुन्हा निवडणूक आयोगात गेला तर निवडणूक आयोगाला यासंदर्भात निर्णय घ्यावा लागले. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण गोठवला जाऊ शकतो. मात्र जर पुरावे सादर करण्यात आले असतील आणि युक्तीवाद संपला असेल तर निवडणूक आयोगाला आज (7 ऑक्टोबर) निर्णय घ्यावा लागेल, असं मत ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी व्यक्त केले.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीचा विचार करता राजकीय पक्ष काय पावलं उचलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यात शिंदे गट आणि ठाकरे गटाने दावा केला तर पोटनिवडणूकीच्या आधी चिन्हाबाबत निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकतो का? तसेच जर पुराव्याच्या आधारे निर्णय झाला तर आज निकाल लागू शकतो, असंही उज्वल निकम यांनी सांगितले.
सध्या पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला वाटले तर ते धनुष्यबाण गोठवू शकतात, असं मत उज्वल निकम यांनी व्यक्त केले. मात्र धनुष्यबाण गोठवल्यास अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात आणि मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत नेमके काय परिणाम होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.