बंडखोर आमदाराविरोधात बहिणीचे बंड !

शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्या आमदारा विरुद्ध निवडणूक लढवण्याची तयारी बहिणीने केली आहे.;

Update: 2022-07-28 10:58 GMT

शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या ४० आमदारांना आपण पुन्हा निवडून आणू असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. पण आता या आमदारांविरोधात त्यांच्याच जवळच्या लोकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे. असाच प्रकार जळगाव जिल्ह्यातील बंडखोर आमदार किशोर पाटील यांच्याबाबत घडला आहे. मॅक्स महाराष्ट्रला दिलेल्या विशेष मुलाखतीत शिवसेनेचे माजी आमदार आर ओ पाटील यांच्या कन्या तसेच बंडखोर आमदार किशोर पाटील त्यांच्या भगिनी वैशाली पाटील (सूर्यवंशी) यांनी उद्धव ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शिवसेनेचा आदेश आल्यास आपण लढण्यासाठी तयार आहोत असे संकेतच वैशाली पाटील यांनी दिले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-भडगावचे शिवसेनेचे बंडखोर आमदार किशोर पाटील शिंदे गटात गेल्याने त्यांना आता घरातूनच बंडाचा सामना करावा लागण्याची वेळ आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक शिवसेनेचे पाचोऱ्याचे माजी आमदार आर ओ पाटील यांनी वारसदार म्हणून आपल्या कन्या वैशाली पाटील (सूर्यवंशी) यांना पुढे न करता पुतण्याला म्हणजेच किशोर पाटील यांना पुढे केले आणि शिवसेनच्या तिकिटावर आमदारही केलं. कि

बंडात सहभागी झालेल्या किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळणार आशा आहे. पण ते शिंदे गटात गेल्याने किशोर पाटील यांच्या भगिनी असेलेल्या वैशाली पाटील (सूर्यवंशी) नाराज आहेत. वडील आणि काकांचा म्हणजेच दिवंगत माजी आमदार आर ओ पाटील यांचा आणि मूळ शिवसेनेशी विचारांशी आमदार भावाने फारकत घेतल्याचा थेट आरोप त्यांनी केलाय. ठाकरे कुटुंबाबरोबर असल्याने भाऊ असलेल्या किशोर पाटील यांच्या पाठीशी वैशाली पाटील (सूर्यवंशी) उभ्या राहिल्या, मात्र आता किशोर पाटील ह्या शिंदे गटात गेल्याने बहिणीने त्यांच्या विरुद्ध थेट मोहीमच उघडली आहे. मतदार संघात उद्धव ठाकरे यांना समर्थन देणारे बॅनर्स ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत यामुळे आता जळगाव जिल्ह्यात कालपर्यंत एकत्र असलेल्या बहिण भावात राजकीय सामना रंगणार असे चित्र आहे.

शिवसेनेचे पाचोऱ्याचे दिवंगत माजी आमदार आर ओ पाटील यांचा मतदार संघात तसेच जिल्ह्यात दबदबा होता. त्यांच्या पुण्याईनेच किशोर पाटील शिवसेनेत दुसऱ्यांदा आमदार झाले, आता आर ओ पाटील यांच्या कन्या वैशाली पाटील ह्याच आता किशोर पाटील यांच्या विरुद्ध मैदानात उतरल्याने शिवसेनेला आणि ठाकरे कुटुंबाला एक बळ मिळाल्याचं बोललं जातं आहे.

कोण आहेत वैशाली पाटील?

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा- भडगाव मतदार संघाचे शिवसेनेचे दोनवेळा आमदार झालेले दिवंगत आर ओ पाटील यांच्या वैशाली पाटील ( सूर्यवंशी) ह्या एकुलत्या एक कन्या आहेत. आर ओ पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीत मदत करणारे आणि सध्या आमदार असलेले किशोर पाटील हे माजी आमदार आर ओ पाटील यांचे पुतणे आहेत.

यामध्ये आमदार किशोर पाटील राजकारण सांभाळतात तर शैक्षणिक संस्था आणि निर्मल सिड्स हे उद्योग आर ओ पाटील यांच्या कन्या वैशाली पाटील ( सूर्यवंशी) सांभाळतात. आमदार किशोर पाटील आणि वैशाली पाटील हे एकमेकांचा चांगला आदर करतात, एकमेकांविषयी कोणतही वादग्रस्त वक्तव्य सध्या तरी दोघेही टाळत आहे.

शिंदे गटात गेल्यानंतर सुरत आणि गुहाटीला गेलेल्या किशोर पाटील यांच्याशी संपर्क साधून समजवावे असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी वैशाली पाटील ( सूर्यवंशी) सांगितले होते, मात्र त्यांनी ऐकले नाही. "किशोर पाटील यांना वडील आर ओ पाटील यांचा विचार आणि ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ राहण्यासाठी विनंती केली होती, खूप वेळा समजावले, गुहाटीवरून घरी आल्यावरही खूप समजावलं, उद्धव साहेबांचा निरोपही दिला मात्र भावाने ऐकलं नाही" असं वैशाली पाटील यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलतांना सांगितलं.

जळगाव जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 11 जागांपैकी पाच सर्वाधिक आमदार हे शिवसेनेचे निवडून आले आहेत. यातील सर्वच्या सर्व आमदार ह्यांनी बंडखोरी करून शिंदे गटात सामील झाले आहेत.

गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण),

चिमणराव पाटील (पारोळा-एरंडोल),

किशोर पाटील ( पाचोरा-भडगाव),

लताताई सोनवणे(चोपडा),

चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर)

Tags:    

Similar News