संसदेत शिवसेना कुणाच्या सोबत? पक्षाची भूमिका ठरली !

Update: 2022-07-18 10:36 GMT

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर काही खासदारांनीही भाजपसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करावा लागला. या पार्श्वभूमीवर आता संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात शिवसेना काय भूमिका घेणार, मोदी सरकारला घेरणार की समर्थन देणार अशी चर्चा सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेतर्फे राजन विचारे यांच्या व्हीपला लोकसभा सचिवालयाला मान्यता द्यावीच लागेल, कारण कायदेशीररित्या प्रक्रिया करून पक्षाने ते पत्र दिलेलं आहे, असा दावा राऊत त्यांनी केला. एवढेच नाही तर २० जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीबाबत बोलताना न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे आणि शिवसेनेचे सर्व खासदार आमच्या सोबत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

त्याचबरोबर संसदेत शिवसेना मोदी सरकारला घेरणार का, या प्रश्नावर बोलताना राऊत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. सर्व जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावला गेला आहे. देशात पूर स्थिती आहे तर काही ठिकाणी दुष्काळ आहे. त्यात इंधनाचे दर वाढल्याने महागाई वाढली आहे, अशावेळी जीवनावश्यक वस्तूंवर कर लादून निजामशाहीची राजवट या देशात सुरू झाली आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सरकारला सर्वसामान्य लोकांचे जीवन उध्वस्त करायचं आहे का, असा प्रश्न आम्ही सर्वपक्षीय बैठकीत विचारला आणि यावर चर्चा करण्याची मागणी आम्ही केली, अशी भूमिका विनायक राऊत यांनी मांडली आहे.

त्याचबरोबर ED, CBI यांचा दुरूपयोग ज्या पद्धतीने होतो आहे, त्यावर सुद्धा चर्चा करणं गरजेचं आहे, असेही त्यांनी सांगितले. अग्नीपथ योजनेवर संरक्षण मंत्र्यांनी योग्य स्पष्टीकरण द्यावं, त्याचबरोबर चीनने भारताची सीमा अतिक्रमीत केली आहे. त्यावर संरक्षण खाते, देशाचे गृहमंत्री काय करत आहेत या सगळ्यावर चर्चा झाली पाहिजे, अशीही भूमिका त्यांनी मांडली.

दरम्याव रामदास कदम यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत विचारले असता, "जाता जाता उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करायचे हे रचलेले कुंभाड आहे. मागच्या वर्षभरामध्ये तुम्ही स्वतः काय केलं? शिवसेनेच्या विरोधात ज्या काही कारवाया तुमच्या घरातून चालत होत्या त्या जगजाहीर झाल्या आहेत.

तुम्ही शिंदेवासीय, भाजप वासीय होत असताना टीका करत आहात. लोक तुम्हाला किंमत देणार नाहीत" असा इशाराही त्यांनी कदम यांना दिला आहे.

त्याचबरोबर दीपक केसरकर सातत्याने राऊत यांना टार्गेट करत असल्याबाबत विचारले असता "दीपक केसरकर यांना मंत्रीपद हवं होतं म्हणून थयथयाट सुरू आहे. अनेक पक्षाची घरं फिरून आल्यानंतर यांच्याकडून काय अपेक्षा करायची?" असा टोला त्यांनी लगावला. तसेच उद्या जर शिंदे गटाने मंत्रीपद दिलं नाही तर पुन्हा टुणकन उडी मारून दुसऱ्या पक्षात जातील. त्यामुळे आम्हाला त्यांच्या थयथयटाकडे लक्ष द्यायची गरज नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Similar News