शिवसेनेतील बंडानंतर आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत राज्यभरात दौरे सुरू केले आहेत. या दौऱ्यांदरम्यान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बंडखोर आमदार आणि खासदारांवरही जोरदार प्रहार केले आहेत. शिवसेनेत बंड नाही तर गद्दारी झाली, अशी टीका आदित्य ठाकरे सातत्याने करत आहेत.
पण आता आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांनी उत्तर दिले आहे. दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांना आव्हान दिले आहे. तसेच आदित्य ठाकरे भाजप सेनेच्या मतांमुळे जिंकून आले आहेत याची आठवण त्यांनी करुन दिली. तसेच आदित्य ठाकरेंना हरवण्याचा प्रयत्न काँग्रेस राष्ट्रवादीनं प्रयत्न केला, पण भाजपची साथ सोडून आदित्य ठाकरे राष्ट्रवादी सोबत गेले, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
एवढेच नाही तर गद्दार कोण आहे याचे उत्तर हे वरळी विधानसभेतील मतदार देतील, असा इशारा देखाली राहुल शेवाळ यांनी दिला आहे. त्याचबरोबर गटनेता निवडण्यात लोकसभा अध्यक्षांनी घाई केल्याचा विनायक राऊत यांचा आरोपही राहुल शेवाळे यांनी फेटाळला आहे. "आम्ही कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहेत, सर्व खासदारांनी ठराव मांडल्यानंतर गटनेत्याचा निर्णय झाला" असे राहुल शेवाळे यांनी सांगितले आहे. एवढेच नाही तर विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी आमच्यावर अन्याय केला, महत्त्वाच्या विषयावर आम्हाला संसदेत बोलू दिले नाही, असा आरोपही शेवाळे यांनी केला आहे.