महाराष्ट्रात उद्योग आणण्यासाठी दावोसचा दौरा मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री यांनी केला. मात्र हा दौरा ही निव्वळ राज्यातील जनतेची फसवणूक असल्याचे आज मुंबईत आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेवून सांगितले. यावेळी राज्य सरकारवर निशाणा साधत आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारचा दावोसचा अधिकृत कार्यक्रम १६ ते २० जानेवारी होता. या चार दिवसात राज्य सरकारने सरासरी ४० कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला.
राज्यातील कोणत्याही कामाचे टेंडर न काढता राज्य सरकारने कामे कंत्राटदारांना दिल्याची चर्चा सध्या राज्यभरात असल्याचे आदित्य ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. ठेकेदारांना ठरवून राज्य सरकारने कामे दिल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केला आहे. अद्यापही कोणती कामे सुरू झालेली नाही. कोणत्याही प्रकारची टेंडरची प्रक्रिया राबवण्यात आली नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
दावोसमध्ये जावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांनी राज्यात गुंतवणूक किती आणली? हे आजही स्पष्ट नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. चार दिवसानंतर दावोसहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत आल्यानंतर त्यांनी लगेच मी मोदींचा माणूस असल्याचे जाहीररित्या सांगितले. याचा राज्यातील जनतेने काय अर्थ काढायचा? हा एक प्रश्न असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले. राज्य सरकार आणि एमआयडीसीने अद्यापही दावोस दौऱ्याचा जमा-खर्च मांडलेला नाही. त्यामुळे दावोसचा दौरा हा निव्वळ फसवणूक होती, अशी टिका आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून राज्य सरकारवर केली आहे.
राज्य सरकारने राज्यातील चार कंपन्या दावोसमध्ये दाखवून त्यांच्यासोबत करार झाल्याचे सांगितले. जाहीर झालेली कामे दाखवून सरकार खोटे बोलत असल्याच्या दावा ठाकरे यांनी यावेळी केला. महाराष्ट्रात सही केलेले एम.ओ.यु. दावोसमध्ये दाखवल्याचा आरोपही ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून राज्य सरकारवर केला. तसेच २८ तासांसाठी राज्यातील जनतेचे ४० कोटी रुपये दावोसमध्ये खर्च केले गेले. याचा हिशेब कोण देणार? असा प्रश्न ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. त्याचप्रमाणे वेदांता फॉक्सकॉनचे काम सुरु झालेली नाही. टक्केवारीची कामे कोण करतेय हे राज्यातील जनतेला माहित आहे. त्यामुळे मला मुंबई जास्त माहित असल्याचे सुद्धा आदित्य ठाकरे यांनी यावेळी राज्य सरकारला ठणकावूण सांगितले.