रामदास कदमांचे अनिल परबांवर गंभीर आरोप, उदय सामंतांवर प्रहार

Update: 2021-12-18 07:40 GMT

शिवसेना संपवणाऱ्या नेत्यांना आवरा, असे आवाहन रामदास कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अडगळीत गेलेले शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत आपली नाराजी जाहीर केले आहे. यावेळी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका करत गंभीर आरोप देखील केले आहेत. "अनिल परब यांनी शिवसेना संपवण्याचा घाट घातला आहे, त्यांना आवरले नाही तर ते पक्षाचे नुकसान करतील, ते राष्ट्रवादी काँग्रेसची भाषा बोलत आहेत," असा गंभीर आरोपही रामदास कदम यांनी केला आहे.

अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप

अनिल परब यांच्याविरोधात रामदास कदम यांनीच किरीट सोमय्या यांना गुप्तपणे माहिती पुरवली होती, त्यामुळे कदम यांना पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी दिली नाही, अशी चर्चा आहे. पण हे सारे खोटे असून आपण किरीट सोमय्या यांना कधीही भेटलेलो नाही, असा दावा कमद यांनी केला.

शिवसेनेच्या मंत्र्यांविरोधात भाजपच्या नेत्यांना पुरावे दिल्याचा आरोप रामदास कदम यांच्या होतो आहे. तशा आशयाची एक ऑडिओक्लिपसुद्धा काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. या क्लिपमधून कदम हे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात कारवया करत असल्याचे समजत होते. अनिल परब यांच्या रिसॉर्टची माहिती किरीट सोमय्या यांना मदत करत असल्याचे म्हटले जात होते.पण रामदास कदम यांनी ही क्लिप आपल्या आवाजातली नसून एक षडयंत्रं असल्याचा आरोप केला होता. आपल्याविरुद्ध उलट सुलट बातम्या चालवण्यात आल्या आहेत आणि आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे केले आहे, म्हणून बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतल्याचे त्यांनी सांगितले.

"परब यांचा रत्नागिरी जिल्ह्यावर अन्याय"

अनिल परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री असले तरी ते फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला जिल्ह्यात येतात, अन्यथा त्यांनी जिल्हा वाऱ्यावर सोडला आहे, अशी टीका कदम यांनी केली. अनिल परब यांच्या हॉटेलविरुन बोललो तर ते पक्षाविरोधात बोलणे असल्याचा पसरवले जाते. यांच्या खासगी मालमत्तांचा शिवसेनेसोबत काय संबंध, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. शिवसेनेमधल्या काही नेत्यांचा आपल्याला राजकारणातून संपवण्याचा डाव आहे, असा आरोप करत अनिल परब यांनी वांद्रेमधून निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले आहे. तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत आहात म्हणून एखाद्या शिवसेना नेत्याला राजकारणातून कायमाचे संपवायचे, प्रयत्न करणे योग्य नाही, असाही आरोप त्यांनी केला आहे. आपल्या मुलाला तिकिट मिळू नये म्हणून अनिल परबांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणून प्रयत्न केले असा आरोपही त्यांनी केला.


Full View

Tags:    

Similar News