उलट गोवंश वाढतच जाईल- शिवसेनेचा हल्लाबोल

जे पी नड्डा यांनी देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील आणि देशात फक्त भाजपच शिल्लक राहील, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर शिवसेनेने सामनातून नड्डा यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.;

Update: 2022-08-04 03:13 GMT

शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठींब्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे शिवसैनिक शिंदे गटाच्या आमदारांसह भाजपविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यातच आगामी काळात देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील आणि देशात फक्त भाजपच राहील, असं वक्तव्य भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलं होतं. त्याचा शिवसेनेने चांगलाच समाचार घेतला आहे.

शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून नड्डा यांचा समाचार घेतांना म्हटले आहे की, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा हे पक्षातील इतरांच्या तुलनेत बरे आहेत, असा एकंदरीत समज होता. त्याचे कारण ते हिमाचल सारख्या थंड प्रदेशातून आले आहेत आणि ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून सक्रीय राजकारणात आहेत. त्यामुळे त्यांना लोकशाहीचे भान असेल असं वाटत होतं. मात्र अखेर नड्डाही सब घोडे बारा टके अशी भाषा बोलू लागले आहेत, असं म्हणत जे पी नड्डा यांनी केलेले वक्तव्य गर्व आणि अहंकाराने फुलले असल्याचे म्हटले आहे.

भाजपने शिवसेनेला संपवण्याची भाषा करणे म्हणजे कृतघ्नपणाचा कळस असल्याची टीका सामनातून केली आहे. त्यामध्ये पुढे असं म्हटलं आहे की, आज शिवसेना भाजपमध्ये दुरावा असला तरी पंचवीसेक वर्ष शिवसेनेने भाजपला खांद्यावर घेऊन फिरवलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावावर महाराष्ट्रात तरलात. तसंच गुजरात दंगलीचा संदर्भ देत शिवसेनेने भाजपला टोला लगावला आहे. गुजरात दंगलीनंतर मोदी हटाओ मोहिम सुरू करण्यात आली होती. त्यावेळी तात्कालिन पंतप्रधान आणि भाजप नेते अटल बिहारी वाजपायी यांनी मोदी यांना राजधर्म पाळण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी यांचा बचाव केला असल्याचे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

गुजरात दंगलीनंतर अटल बिहारी वाजपायी यांनी मोदी यांना राजधर्म पाळण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, राजधर्म वैगेरे बाजूला ठेवा. हिंदू धर्म म्हणून मोदींना हात लावू नका. गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून हटवू नका. पण आता नड्डा त्याच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवायला निघाले आहेत. त्यावरून नड्डा कोणत्या हवेत आहेत, असा सवाल सामनातून केला आहे.

नड्डा हे हुकूमशहांच्या चेल्यांची भाषा बोलत आहेत. जी भाषा लोकशाहीला मारक आहे. देशात लोकशाही आहे आणि मोदी पंतप्रधान आहेत. त्यामुळे भाजपला पुन्हा पाठींबा मिळाला तर त्यांनी पुन्हा निवडून यावे. पण देशात विरोधकच शिल्लक ठेवणार नाही, ही भाषा लोकशाहीला मारक असल्याची टीका शिवसेनेने केली आहे.

देशात सत्तेवर कोण राहणार हे लोक ठरवतात. तर एकेकाळी काँग्रेसलाही असंच वाटत होतं. मात्र 1978 साली देशात काँग्रेसचा पराभव करून जनता पक्ष सत्तेत आला. तो जनता पक्ष कुठं आहे? असा सवाल सामनातून केला आहे. तसंच त्यानंतर भाजपही पालापाचोळ्यासारखा उडून गेला होता. मात्र अडवाणी यांच्या रथ यात्रेने भाजपला तारल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

सध्या मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप मजबूत स्थितीत आहे. पण राजकारणाइतकं चंचल काहीच नसतं. त्यामुळे लोकांचे मन कधी बदलेल सांगता येत नाही, असं सामनात म्हटले आहे.

हिंदू-मुसलमानात सततची दरी निर्माण करायची आणि निवडणूका जिंकायच्या, असं सध्या सुरू असल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच निवडणूका जिंकत असल्याचे म्हटले आहे. मात्र पश्चिम बंगाल, केरळ, बिहार, ओडीसा, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यात प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत. त्यामुळे ही प्रादेशिक अस्मिता आहे ती राहणारच. सगळे तुमच्या मागे फरफटत येणार नाहीत, असं म्हणत आम आदमी पार्टी हिमाचलमध्ये घुसली तर नड्डांची दमछाक होईल, असं म्हटले आहे.

ईडीचा धाक दाखवून, फुटीर लोकांना खिशात घालून शिवसेनेला आव्हान देत असाल तर शिवसेना आकाशाला गवसणी घालेल. एवढंच नाही तर तुमच्या धमकीला शिवसेना भीक घालणार नाही, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

भाजपचं डोकं असलं तरी काँग्रेस फोडून भाजप उभी केली असल्याची टीका करत हात पाय आणि अवयव काँग्रेसचे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तुमच्याच वंशवेलीचा पत्ता नाही, अशी टीका केली.

पुढे नड्डा यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना म्हटले आहे की, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, अशी ग्रामिण म्हण आहे. त्यानुसार कावळ्याच्या शापाने प्रादेशिक पक्षांच्या गायी मरणार नाहीत, उलट गोवंश वाढतच जातील. कावळे मात्र नष्ट होतील. त्यामुळे शिवसेना ही वाघ आहे आणि वाघाची झेप परवडणार नाही, असंही म्हटलं आहे.

Tags:    

Similar News