राज्यात २०१९मध्ये झालेला महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग हा २००९मध्ये करण्याचा प्रयत्न झाला होता, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांची उद्धव ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
२००९मध्ये संजय राऊत यांनी आपल्याला फोन करुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी होणार आहे, त्यामुळे आपण शिरुर मतदारसंघ शरद पवार यांच्यासाठी सोडावा, असा निरोप दिला होता, असा दावा आढळराव पाटील यांनी केला आहे. एवढेच नाही तर या प्रस्तावाबाबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना माहिती नव्हती, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच ३ जुलै पक्षाने आपल्यावर कारवाई केल्यानंतर आपण उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. पण त्या भेटीमध्येही संजय राऊत यांनी आपण शिरुरऐवजी पुण्यातून लढावे, तो मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडून द्यावा, असे सांगितले. पण त्या प्रस्तावावर देखील आपण आक्षेप सध्याच्या राष्ट्रवादीच्या खासदारांना पुण्यातून का लढवत नाहीत, असा सवाल आपण विचारला, पण त्यावर उद्धव ठाकरे यांनी कोणतेही उत्तर दिले नाही, असा दावाही आढळराव-पाटील यांनी केला आहे.