होय,धनुष्यबाण व शिवसेना चोरून नेली: सामना
विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्यामुळे हक्कभंगाचे संकट येऊ घातलेल्या संजय राऊत यांनी आज पुन्हा सामना संपादकीय मधून सर्वोच्च न्यायालयाच्या मंदिरात चाळीस चप्पलचोरांना थारा नाही,होय,धनुष्यबाण व शिवसेना चोरून नेली असा थेट आरोप केला आहे.;
विधिमंडळातील काल दिवसभरात विधानसभा आणि विधान परिषदेचे कामकाज संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे प्रभावित झाले होते. आज सामना संपादकीयमधून यावर भाष्य करण्यात आले आहे रस्त्यांवरील ‘ कुंड्या ’ आलिशान गाडीत चोरून न्याव्यात त्याप्रमाणे निवडणूक आयोगाबाहेर दिमाखदार गाड्या लावून त्यांनी धनुष्यबाण व शिवसेना चोरून नेली . भाजपचे राज्य असल्यानेच श्रीमंतांना रस्त्यांवरील कुंड्या चोरण्याची विकृती निर्माण झाली , पण हे रस्त्यावरील कुंडीचोर म्हणजे खरी शिवसेना नव्हे . असूच शकत नाही . खरी शिवसेना विधिमंडळ , संसदेच्या बाहेर आहे . न्या . चंद्रचूड यांनी नेमके सत्यच सांगितलं असं सामनाने म्हटलं आहे. निकालाची पर्वा आम्हाला नाही , पण संविधान , सत्य व जनतेचा आवाज मारला जाऊ नये यासाठी हा लढा आहे ! घर म्हणजे चार भिंती नाहीत . शिवसेना म्हणजे विधिमंडळ नाही . निकाल हाच आहे ! सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचा संदर्भ सामनाने घर म्हणजे नक्की काय असतं यावर अनेकांनी अनेक भावना व्यक्त केल्या आहेत. घर म्हणजे फक्त चार भिंती नाहीत. त्या भिंतीत सजवलेल्या टेबल-खुर्च्यादेखील नाहीत. घर म्हणजे घरातली माणसं. त्या माणसांतला जिव्हाळा, प्रेम, ममत्व, कुटुंब म्हणजे घर. अशी घरे जेव्हा स्वार्थासाठी तोडली जातात तेव्हा कुटुंब व्यवस्थेला तडे जातात. नात्यांवरील विश्वास नाहीसा होतो. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ‘शिवसेना’ या कुटुंबाविषयी अप्रत्यक्षपणे तीच भावना व्यक्त केल्याचे दिसते.
महाराष्ट्रातील तथाकथित सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मिंधे गटाचे वकील सांगत आहेत, ‘‘आम्ही म्हणजेच शिवसेना!’’ या ‘आम्ही’वर न्या. चंद्रचूड यांनी घेतलेला आक्षेप महत्त्वाचा आहे. ‘‘विधिमंडळात तुमच्याकडे बहुमत आहे याचा अर्थ तुम्ही म्हणजे पक्ष होत नाही.’’ न्या. चंद्रचूड यांनी नेमके विधान केले आहे. विधिमंडळातील फक्त चाळीस आमदार म्हणजेच शिवसेना, असा निर्णय निवडणूक आयोगातील ईस्ट इंडिया कंपनीच्या एजंटांनी दिला काय आणि या विकतच्या बहुमतवाल्यांनी नाचायलाच सुरुवात केली, पण कितीही नाचकाम केले तरी सर्वोच्च न्यायालयात न्यायासाठी सुनावणी सुरू आहे व न्याय मेला नाही हे लवकरच कळेल. महाशक्तीने निवडणूक आयोग खिशात घातला, पण सर्वोच्च न्यायालय हे मंदिर आहे. त्या मंदिरात चाळीस चप्पलचोरांना थारा नाही. दिल्लीतील वृत्तपत्रांत एक मजेशीर बातमी प्रसिद्ध झाली आहे, त्याचा संदर्भ देत सामना संपादकीयने शिवसेना व धनुष्यबाणाच्या चोरीशी त्या बातमीचा संबंध जोडता येईल असं सांगितलं आहे. हरियाणातील गुरगाव येथे एक अतिश्रीमंत माणूस आपल्या कोटय़वधीच्या आलिशान गाडीत रस्त्यांवरील सरकारी कुंड्या घालून निघून गेला. सध्या ‘G-20’ नामक जो काही आंतरराष्ट्रीय उत्सव आपल्या देशात सुरू आहे, त्या जागतिक प्रतिनिधींना आमचा देश सुंदर वाटावा, रस्त्यांच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून या कुंड्या झाडांसह रस्त्याच्या दुतर्फालावण्यात आल्या. त्या कुंड्या एका श्रीमंताने दिवसाढवळय़ा चोरून त्याच्या घराची शोभा वाढवली. अगदी असलाच प्रकार उत्तर प्रदेशातील लखनौलादेखील घडला. लखनौच्या रस्त्यांवरून कोटय़वधीच्या कुंड्या झाडांसह चोरण्यात आल्या व त्याचा व्हिडीओदेखील समोर आला.
दोन्ही राज्यांत भाजपचीच संस्कारक्षम राज्ये आहेत. कुंड्या जनतेसाठी होत्या. त्या भाजपच्या राज्यात श्रीमंतांनी चोरल्या. शिवसेना व धनुष्यबाणाच्या बाबतीत नेमके हेच घडले. दिवसाढवळय़ा चाळीस चोरांनी दरोडा टाकला. चाळीस जणांची चोरांची टोळी हा ‘चोरबाजार’ होऊ शकतो, पण चोरबाजार म्हणजे शिवसेना हे कसे घडेल? चोरांना रस्त्यावर अडवून जनता जागोजागी जाब विचारीत आहे. मिंधे गटाच्या भजनी लागलेले आमदार बच्चू कडू हे धाराशीव जिल्हय़ात एका कार्यक्रमासाठी गेले असता तेथील लोकांनी, आबालवृद्धांनी त्यांना घेरावच घातला. ‘‘चोर-डाकूंसोबत तुम्ही गेलात कसे? लाजलज्जा गुंडाळून ठेवलीत काय?’’ असा जाब विचारून लोक त्यांची गाडी अडवू लागले तेव्हा बच्चूभाईंचा आंबट चेहरा पाहण्यासारखा झाला होता. सर्वच चाळीस आमदारांवर जागोजागी हीच वेळ आली. कारण शिवसेना जनतेत आहे. फक्त चार भिंतींतील घुमटाखालच्या विधिमंडळात नाही. न्या. चंद्रचूड यांनी नेमके तेच आणि तेच स्पष्ट केले आहे. लोकशाही म्हणजे मोदी-शहांची हुकूमशाही नाही व निवडणूक आयोगाची मनमानी म्हणजे अंतिम निकाल नाही. बऱ्याच गोष्टी अजून ठरायच्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर चोर मंडळाने विधिमंडळ व संसदेतील शिवसेनेची कार्यालये ताब्यात घेतली. का? तर म्हणे निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नेतृत्व भाजपचे ‘मिंधे’ असलेल्यांच्या हातात दिले. मुळात महाराष्ट्राच्या जनतेने शिवसेनेचे नेतृत्व श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे दिले होते. निवडणूक आयोगाने नाही. शिवसेना हे आंदोलन आहे. ते काही निवडणूक आयोगाची निर्मिती नाही. ती ठिणगी शिवसेनाप्रमुखांनीच टाकली.
विचारांचे रोपटे शिवसेनाप्रमुखांनी लावले तेव्हा विधिमंडळ, लोकसभा, विधिमंडळ पक्ष काय तो अस्तित्वात नव्हते. आमदार-खासदार काय तर नगरसेवकही नव्हते. त्यामुळे विधिमंडळातील फुटीर आमदारांचा ‘चोर गट’ म्हणजेच शिवसेना हा निर्णय बकवास आहे. न्या. चंद्रचूड यांनी तेच सांगितले आहे. विधिमंडळ पक्ष प्रत्येक निवडणुकीनुसार बदलत असतो. आजचा ‘चोर गट’ उद्या विधिमंडळात नसेल. मग निवडणूक आयोगाच्या आजच्या निर्णयाचे काय? थेट शिंदगटावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सामना संपादकीयमधून शिंदे गटात स्वबळावर काही करण्याची कुवत नाहीच. हिंमतदेखील नाही, असं सांगण्यात आला आहे. रस्त्यांवरील ‘कुंड्या’ आलिशान गाडीत चोरून न्याव्यात त्याप्रमाणे निवडणूक आयोगाबाहेर दिमाखदार गाड्या लावून त्यांनी धनुष्यबाण व शिवसेना चोरून नेली. भाजपचे राज्य असल्यानेच श्रीमंतांना रस्त्यांवरील कुंड्या चोरण्याची विकृती निर्माण झाली, पण हे रस्त्यावरील कुंडीचोर म्हणजे खरी शिवसेना नव्हे. असूच शकत नाही. शिवसेना विधिमंडळाच्या चार भिंतीबाहेर आहे. शिवसेना म्हणजे सजावट व शोकेस नाही. आमदार-खासदार हे राजकीय डेकोरेशन आहे. खरी शिवसेना विधिमंडळ, संसदेच्या बाहेर आहे. बच्चू कडूसारख्यांना भररस्त्यात अडवून त्यांची बोलती बंद करण्याची हिंमत दाखवणारा माणूस म्हणजे शिवसेना. रस्त्यावर अडवून, ‘‘चोर-डाकूंबरोबर कसे काय जाता?’’ असे विचारून चोरांच्या साथीदारांना पळवून लावणारी जनता म्हणजे शिवसेना. शिवसेना कुठल्याही चार भिंतींच्या कोंडवाड्यात नाहीच नाही. ती रस्त्यावर, खुल्या मैदानात उसळते आहे, असे शेवटी सामना संपादकीय मधून सांगण्यात आल्या आहेत.