राहुल गांधी यांच्या संघर्षात सातत्य नाही, सामनामधून शिवसेनेचा थेट हल्ला
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील आघाडी सरकार अस्थिर असल्याची चर्चा ताजी असतानाच आता आघाडी सरकारमध्ये आणखी एक मिठाचा खडा पडला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून राहुल गांधी यांच्यावर थेट हल्ला करण्यात आला आहे.;
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आहेत. पण आता काँग्रेसवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून थेट टीका करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्या कामात सातत्य नाही अशी थेट टीका सामनाच्या अग्रलेखामधून करण्यात आली आहे. एवढेच नाही तर सध्या काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या पक्षांतर्गत घडामोडींवर यामधून थेट भाष्य करण्यात आले आहे.
काँग्रेसचा अस्तित्वासाठी संघर्ष
"राहुल गांधी यांची वक्तव्ये कधी कधी जोरदार असतात. अनेकदा त्यांची चमकदार व पल्लेदार संवादफेक चर्चेचा विषय ठरते. राहुल गांधी यांनी नुकतेच कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले की, ''डरपोक नेत्यांनी पक्षातून चालते व्हावे. आर.एस.एस.वाल्यांची काँग्रेसला गरज नाही.'' गांधी यांनी हा हल्ला ज्योतिरादित्य शिंदे व जितीन प्रसाद यांच्यावर केला आहे. स्वातंत्र्यलढय़ात काँग्रेसचे योगदान मोठेच आहे. निर्भयपणे काँग्रेसचे पुढारी स्वातंत्र्य आंदोलनात उतरले. धाडस स्वातंत्र्य चळवळीत संघ किंवा इतरांनी दाखविल्याचे दिसत नाही. भारतीय जनता पक्षाचा तेव्हा जन्मही झाला नव्हता. त्यामुळे काँग्रेस पक्ष हिंमतवाला होता, डरपोक नव्हता. देशभक्तीशी त्यांचे अतूट नाते तेव्हा होतेच, पण तो काँगेस पक्ष आज उरलेला नाही. एक काळ असा होता की, काँगेसच्या नावावर दगड उभा केला तरी तो निवडणुकीत विजयी होत असे. काँगेसची उमेदवारी म्हणजे विजयाची पक्की गॅरंटी. हे चित्र आज बदलले आहे व काँग्रेस अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे."
काँग्रेस दिशाहीन
एवढेच नाही तर काँग्रेस सध्या दिशाहीन झाल्याची टीकाही सामनामधून करण्यात आली आहे. "काँग्रेस पक्षाला नक्की काय करायचे आहे व त्यांची दिशा कोणती याबाबत संभ्रम आहे. प्रियंका गांधी या दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात गेल्या तेव्हा लोकांचा त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. राहुल गांधी रस्त्यावर उतरतात तेव्हा त्यांच्या भोवतीही गर्दीचा माहोल बनतो, पण या संघर्षात सातत्य हवे. राजकारणात प्रवाह थांबला तर डबके होते हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे."
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक
"संघाच्या विचारांविषयी एखाद्याचे मतभेद असू शकतात, पण अनेक क्षेत्रांत ते करीत असलेले काम महत्त्वाचे आहे. सर्वस्व झोकून देत काम करणारे प्रचारक व स्वयंसेवक यांना दुर्लक्षून चालणार नाही. असे झोकून काम करणारे लोक पूर्वी काँग्रेस पक्षातही होतेच. आज असे लोक शिवसेनेत आहेत. सत्ता असेल किंवा नसेल, पक्षासाठी झोकून देऊन काम करणारे झोकदार लोकच पक्ष आणि संघटन टिकवीत असतात. अनेक राज्यांत काँग्रेसकडे असे लोक राहिलेले नाहीत. प. बंगालमध्ये भाजपपेक्षा दारुण पराभव काँग्रेसचाही झाला. उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश हे मोठे प्रदेश कधीकाळी काँग्रेसचे गड होतेच. आज तेथे काँग्रेससाठी परिस्थिती कठीण आहे. प्रियंका गांधी शिकस्त करतील, पण कार्यकर्त्यांना ऊर्जा देणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही असे राहुल म्हणतात ते बरोबर आहे, पण पक्षामधून 'डरपोक' जात राहिले तरी काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय, ते पाहावे लागेल. या शब्दात सामनामधून काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे.