'राणेंवरील कारवाई सुडाची की बिनबुडाची न्यायालय ठरवेल' -संजय राऊत
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपशब्द काढल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे, यावरून पाच वर्षे काय झोपले होते का? असा सवाल करत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला;
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर पोलिसांनी अटक केली, न्यायालयाने त्यांना जामीन दिला. मात्र या प्रकरणावरून भाजप- सेनेत चांगलीच जुंपली आहे, दरम्यान भाजपकडून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपशब्द काढल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला.
या घटनेला पाच वर्षे झाली पाच वर्षे तुम्ही झोपला होता का?, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपला चांगलंच फैलावर घेतलं आहे.
मुख्यमंत्र्यांविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कुणी काय म्हटलं मला माहीत नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. तोपर्यंत तुम्ही झोपले होते का? तेव्हा ते विधान आक्षेपार्ह वाटलं नव्हतं का?, असा सवाल राऊत यांनी केला आहे.
दरम्यान नारायण राणे यांच्यावरील कारवाई सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे असा आरोप भाजपकडून केला जात आहे त्यावर बोलताना, केंद्राच्या तपास यंत्रणाकडून महाराष्ट्र केलेल्या कारवाई काय आहेत हे भाजपने आधी सांगावं, राणेंवर झालेली कारावाई सुडाची आहे की बिनबुडाची आहे ते न्यायालयात स्पष्ट होईलच, देशातील न्यायालये काही प्रमाणात स्वतंत्र आहेत, ही कारवाई कायदेशीर आहे एवढंच मी सांगतो असं राऊत म्हणाले.
दरम्यान परिवहन मंत्री अनिल परब यांनी पोलिसांना दिलेल्या सुचनेबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, ते त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यामुळे त्यांनी सूचना दिली त्यात गैर काय? मी ती क्लिप पाहिलेली नाही पण पालकमंत्री म्हणून त्यांनी पोलिसांना सूचना दिली त्यात मला काही चुकीचं वाटत नाही असं राऊत म्हणाले. परब जरी गृहमंत्री नसले तरी एक मंत्री म्हणून ते सरकारचा एक भाग आहेत असंही राऊत म्हणाले.