केंद्र सरकारने राज्याला भरघोस मदत करावी ; खा. संजय राऊत
राज्याला या महापुराच्या कटातून सावरण्यासाठी केंद्र सरकारने भरघोस मदत करण्याची आवश्यकता असल्याचे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. सोबतच आ. भास्कर जाधव यांच्याबाबत विचारले असता अशा परिस्थितीत संयम ठेवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.;
मुंबई : महाराष्ट्रातल्या 11 जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती आहे. लाखो लोकांना पुरामुळे बेघर होण्याची वेळ आली आहे. मोठे नुकसान या पुरामुळे झाले आहे. त्यामुळे उध्वस्त झालेल्या कुटुंबांना पुन्हा सावरण्याची जबाबदारी राज्यातील प्रत्येक व्यक्तीची आहे. असं म्हणत राज्याला या संकटातून सावरण्यासाठी केंद्र सरकारने भरघोस मदत करण्याची आवश्यकता असल्याचे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
या महापुरामुळे अनेकांचे जीव गेले आहेत त्यांचं कुटुंब उध्वस्त झाले आहे. त्या सगळ्यांना आता सावरायची वेळ आहे. महाराष्ट्र सरकार यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे, पण केंद्र सरकारने देखील जास्तीत जास्त मदत महाराष्ट्राला करावी. तसेच मुंबई शहरात अनेक धनिक लोक आहेत, त्यांनीसुद्धा महाराष्ट्राला पुन्हा सावरण्यासाठी हातभार लावला पाहीजे असं खा. राऊत यांनी म्हटलं आहे.
महाड, सातारा, सांगली, कोल्हापूर येथे गावची - गावं उध्वस्त झाले त्या गावांना आता पुन्हा एकदा उभं करावं लागेल. राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितला आहे. पण ही सगळ्यांची जबाबदारी आहे महाराष्ट्राने ज्याला कोणाला दिले त्या सगळ्यांनी आता महाराष्ट्राला देण्याची त्यांची जबाबदारी आहे. राज्याला सहस्त्र हातांनी मदत करा असं आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
अशा परिस्थितीत संयम ठेवणे गरजेचे
दरम्यान आ.भास्कर जाधव यांच्याबाबत विचारलं असता, "मी पाहिलं नाही वृत्तपत्रांमध्ये वाचलं त्यामुळे त्या सगळ्यावर तेच बोलतील, पण या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये संयम ठेवणे गरजेचे आहे. लोकांचा आक्रोश- वेदना समजून घेणे महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री आणि सरकार हे करते आहे" असं राऊत यांनी म्हटलं आहे.