शिवसेना नेते रामदास कदम करणार गौप्यस्फोट ; विरोधकांना दिला इशारा

Update: 2021-11-18 04:03 GMT

मुंबई : मागील काही दिवसांपासून शिवसेनेत काहीसे बाजूला पडलेले रामदास कदम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कदम यांनी काल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जात त्यांना अभिवादन केले. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात कदम यांनीच पुरावे दिल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. त्यानंतर रामदास कदम यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दसरा मेळाव्यात देखील रामदास कदम अनुपस्थित होते. मात्र, बुधवारी माध्यमांसमोर रामदास कदम यांनी विरोधकांना इशारा दिला.

कदम यावेळी म्हणाले की, आगामी काळात मी पत्रकार परिषद घेत अनेक गोष्टींचा खुलासा करणार आहे. माझी बाजू मांडताना अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट होणार आहे. माझ्याविरोधात बातम्या कुठून येतात. हा कुणाचा कट आहे. हे मला माहिती आहे. मी एक कडवट शिवसैनिक असून भगव्याची साथ सोडणार नाही असं कदम यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे कदम नक्की कोणाच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

तसेच बाळासाहेबांमुळेच मराठी माणूस आज ताठ मानेने जगतोय. आमच्यासारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्यांना देखील बाळासाहेबांनीच मोठे केले असं कदम म्हणाले. विशेष म्हणजे रामदास कदम शिवसेना सोडणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु होती. त्यावर कदमांनी स्पष्टीकरण दिले.

Tags:    

Similar News