रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर शेलक्या शब्दात टिका...
ज्यांच्या हातात धनुष्यबाण तो चोर असं म्हणता, मात्र ते पवित्र धनिष्यबाण तुम्हाला मिळू शकले नाही, अशी टीका रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. उद्धव ठाकरेंचे हात भ्रष्ट्राचाराने बरबरटलेले आहेत. माझ्या नादाला लागू नका, असा सज्जड दम रामदास कदम यांनी ठाकरे यांना दिला आहे.
शिवसेना माझी खाजगी मालमत्ता असल्यासारखे उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) वागत असल्याचा आरोप रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी लगावला आहे. मी म्हणजे शिवसेना आणि मी म्हणेल ती शिवसेनेत पूर्वदिशा, अशा हुकुमशहा पद्धतीने उद्धव ठाकरे वागत असल्याचे कदम यांनी सांगितले. आणि मला बदनाम करण्याचे काम ठाकरे पिता-पुत्रांनी केल्याचा आरोप सुद्धा कदम यांनी लगावला. ठाकरे सेनेत बाप मुख्यमंत्री, बेटा मंत्री आणि नेते बाहेर असे काम चालते. त्यामुळे आम्हालाही बोलता येत, असे कदन यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सुनावले आहे. उद्धव ठाकरे यांचे हात गेल्या अडीच वर्षाच्या आघाडीच्या कार्यकाळात भ्रष्ट्राचाराने बरबरटलेले आहेत, माझ्या नादाला लागू नका, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दिली आहे.
आमदार योगेश कदम यांना संपवण्याचे कटकारस्थान उद्धव ठाकरे यांनी हॉस्पिटमध्ये असताना केल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. स्थानिक आमदार असताना पक्षातील नेत्यालाच संपवण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केल्याचे कदम यांनी सांगितले. तुमच्या सगळ्यांना मी १९ तारखेला उत्तर देणार असल्याचे कदम यांनी सांगत गेल्या निवडणुकीत मला पाडण्याची सुपारी उद्धव ठाकरेंनी दिल्याचा खुलासा कदम यांनी केला. तसेच गुहागरच्या राजकारणातून भास्कर जाधव तुला गाडला नाही तर बघ. मतदारसंघातील जनताच तुला उत्तर देईल. रामदास कदमांवर बोलण्याची भास्कर जाधव तुझी औकात आहे का? असा प्रश्न कदम यांनी विचारला आहे. १९९५ साली विधानसभा निवडणुकीत भास्करराव तुला तिकीट देण्यासाठी मी बाळासाहेबांना सांगितले होते, तेव्हा जाधव तुला तिकीट मिळाल्याचा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला. त्यावेळी भास्कराव तु जमिनीवर साष्टांग दंडवत घालून माझ्या पाया पडला होता, ते विसरला वाटते. अशी टीका रामदास कदम यांनी जाधव यांच्यावर केली.
पक्ष सोडून आमदार, खासदार का जातात याचे उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचा सल्ला कदम यांनी ठाकरेंना दिला. बाळासाहेब असते तर तुम्ही कधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसू शकला नसता हे लक्षात असू द्या उद्धव ठाकरे, असा चिमटा सुद्धा कदम यांनी काढला. शिवसेना भवनात उमेदवारांचे फोन यायचे की, रामदास कदम यांची आमच्या मतदारसंघात सभा ठेवा पण तेव्हा तुम्ही ते सोडून इतर काहीही सांगा, असे बोलायचे. तुमचा चेहरा भोळा आहे. पण त्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे लपलेले आहेत, याचा मी साक्षीदार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. तुमची नसनस मी ओळखतो, असा घणाघाती आरोप रामदास कदम यांनी केला.
अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यावेळी शिवसेनेच्या (Shiv Sena) किती आमदारांना विकास निधी दिला याचा विचार करा. अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Nationalist Congress Party) आमदारांना सर्वाधिक निधी दिला. तुम्ही मुख्यमंत्री असून सुद्धा आमदारांना १६ टक्केचं निधी दिलात. याची लाज वाटत नाही का? लोकांना भावनात्मक ब्लॅकमेल करणे आतातरी थांबवा. भर सभेत तुम्ही म्हणालात की, मी केशव भोसलेच्या गाडीवर ड्रायव्हर होतो, मी ड्रायव्हर होतो हे सिद्ध करा, मी तुमच्या घरी भांडी घासेन नाहीतर तुम्ही माझ्या घरी भांडी घासायला या, असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला. तुम्ही लिलावती हॉस्पिटलमध्ये आजारी होता आणि तुम्ही बरे झाल्यावर तुम्हाला राज ठाकरे यांनी आपल्या गाडीतून मातोश्रीवर सोडले, तेव्हा ते तुमचे ड्रायव्हर होते का? तसेच संदीप देशपांडेवर हल्ला कुणी केला? असा सवालही रामदास कदमांनी उपस्थित केला.
तिकीट देण्यासाठी, कापण्यासाठी तुम्ही पैसे घेत असाल तर अशा भ्रष्टाचाराने बरबरटलेल्या हातात पवित्र धनुष्यबाण कसा राहू शकेल? ज्याला कावीळ असते त्याला जग पिवळे दिसते. सुरवात तुम्ही केली आहे. तुमचा शेवट मी करणार आहे. भविष्यात तुम्हाला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. माझ्या नादाला लागू नका. मी शांत बसलोय, मला डिवचण्याचा प्रयत्न करु नका, बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) विचारांशी तुम्हीच बेईमानी केली. त्यामुळे तुला बाळासाहेबांचे नाव घेण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे रामदास कदम यांनी सांगत, हे चोरले, ते चोरले मग तू काय करतोस? झोपलाय का? असा घणाघात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.