प्रा.हरी नरके : अतिशय सुमार आणि टाकाऊ गाणी ऐकण्याची मनाची तयारी करा

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने राज्याचे कोणते नुकसान झाले आहे. लोकशाहीची मुल्ये कशी तुडवली गेली....याचे विश्लेषण केले आहे प्रा. हरि नरके यांनी...

Update: 2022-06-30 05:06 GMT

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने राज्याचे कोणते नुकसान झाले आहे. लोकशाहीची मुल्ये कशी तुडवली गेली....याचे विश्लेषण केले आहे प्रा. हरि नरके यांनी...त्यांच्या फेसबुक पोस्टवरुन साभार...

श्री.उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तो देताना ते किती संयमाने आणि कळकळीने बोलले. कोणीही मागितलेला नसताना त्यांनी विधान परिषद सदस्य पदाचाही राजीनामा दिला. त्यांना आमदारकी सोडा असं कुणीही म्हणाले नव्हते.

१) करोना काळात २ वर्षे ७ महिने २ दिवस उद्धवजींसारखा सुसंस्कृत, कुटुंबवत्सल असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला होता म्हणूनच महाराष्ट्र आजही सुरक्षित आहे. त्याकाळात वर्षावर आणि सहाव्या मजल्यावर कर्कश भोंगा असता तर गुजरात, उत्तरप्रदेश प्रमाणे इथेही हजारो मृत्यू दडवले गेले असते. कोल्हापूरच्या पुरात जसे लोकांना वाऱ्यावर सोडले गेले होते तशी मराठी जनता सैरभैर होऊन मदतीसाठी बेवारस स्थितीत हाती कटोरा घेऊन फिरत राहिली असती.

२) आता २४×३६५ कर्कश भोंगे ऐकण्यास तयार रहा. अतिशय सुमार आणि टाकाऊ गाणी ऐकण्याची मनाची तयारी करा.

३) याकाळात कायकाय बघायला मिळाले. काल सर्वोच्च न्यायालयाने सलग साडेतीन तास युक्तीवाद ऐकले. कोर्टाची विनोदबुद्धी तल्लख असल्याने आमदारांची अपात्रता आणि विश्वास ठराव यांचा संबंधच काय असा प्रश्न विचारला गेला. आमदारांना नोटीसीला उत्तर द्यायला ४८ तास अपुरे असल्याने ती मुदत ११/७ पर्यंत वाढवून देणाऱ्या न्यायालयाने २८८ आमदारांना ताबडतोब मुंबईत येऊन विश्वास मत द्यायला मात्र २४ तासांचा अवधी पुरेसा ठरवला.

४) केंद्र सरकारचे अटर्णी / सॉलिसिटर जनरल राज्यपालांची बाजू मांडताना राज्यशासन व विधान सभा उपाध्यक्ष यांच्या प्रत्येक मुद्द्याला विरोध करीत होते तेव्हाच बलाढ्य केंद्र सरकार यात किती खोलवर गुंतलेय ते स्पष्ट झाले.

५) कबूल केलेला शब्द पाळला नाही म्हणून संपूर्ण पक्ष एकमताने आघाडीत जातो तो जनादेशाचा अपमान असतो मात्र तोच पक्ष इडीच्या दहशतीने फोडणे, सगळ्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करणे, कोट्यवधी रुपयांच्या थैल्या देऊन घोडेबाजार करणे, पक्षांतर बंदी कायदा मोडून पक्ष फोडणे हे सारे करून सत्तेत येणारे साधनसुचितावाले नी जनादेशाचा सन्मान करणारे असतात?

६) याला लोकशाही म्हणतात? विरोधकांचे फोन टॅप केले म्हणून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष यांना राजीनामा द्यावा लागला होता. इथे पेगासिसचे लायसन्स घेऊन, विरोधकांना माफिया दाखवून, त्यांची खोटी नावे फाईलवर लिहून फोन टॅप केले जातात हे मात्र लोकशाहीचा सन्मान करणारे होते?

७) भाडोत्री मीडिया, बलाढ्य केंद्रीय यंत्रणांचा अहोरात्र गैरवापर आणि पैशाचा व दिलासालयाचा मनमानी वापर करूनही नाना फडणीस यांना मविआ सरकार २ वर्षे, ७ महिने २ दिवस पाडता आले नाही.

८) चला पुन्हा एकदा नाना फडणीस, घाशीराम कोतवाल आणि दुसरा बाजीराव यांच्या पेशवाईचा सामना करण्यासाठी संविधानाच्या मार्गाने लढूयात.

९) लढेंगे और जितेंगे भी! ही रात्र सव्वा दोन वर्षांची असेल. तरी हे दक्षिणायन संपणार आहे. अंधार हटणार आहे. कारण याच्या मागे ना सत्य आहे ना साधनसुचिता ना लोकशाही मूल्ये.

Tags:    

Similar News